नव्या पिढीच्या नव्या जाणीवा
एकत्र कुटुंबातील तीन पिढ्यांचं चित्रण असलेला राजवाडे अँड सन्स हा चित्रपट टेलिव्हिजनवर पहिल्यांदाच स्टार प्रवाहवर दिसणार आहे. नव्या पिढीच्या नव्या जाणीवा या चित्रपटाच्या केंद्रस्थानी असून, २५ डिसेंबर रोजी दुपारी एक आणि रात्री साडेआठ वाजता हा चित्रपट दाखवला जाणार आहे.
पुण्याच्या पार्श्वभूमीवर, एका उद्योजक कुटुंबातील तीन पिढ्यांचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. बदलत्या एकत्र कुटुंब पद्धतीवर हा चित्रपट भाष्य करतो. तसंच आताच्या पिढीची लाइफस्टाइल, त्यांचे व्यावहारिक विचार, नात्यातील गुंता यात मांडण्यात आले आहेत.
सचिन कुंडलकर यांनी चित्रपटाचं लेखन व दिग्दर्शन केलं आहे. वेगळ्या विषयाची फ्रेश मांडणी, कलात्मकता जपत व्यावसायिक पद्धतीनं केलेली हाताळणी ही सचिनच्या चित्रपटाची खासियत आहे. ‘राजवाडे अँडसन्स’मधूनही त्याचा प्रत्यय येतो. अलीकडच्या काळातला युवा पिढीचे हे चित्रण बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले होते. या चित्रपटात अतुल कुलकर्णी, मृणाल कुलकर्णी, सचिन खेडेकर, सतीश आळेकर, ज्योती सुभाष, पौर्णिमा मनोहर, राहुल मेहेंदळे या अनुभवी कलावंतांसह सिद्धार्थ मेनन, आलोक राजवाडे, मृण्मयी गोडबोले, कृतिका देव व सुहानी धडफळे या नव्या दमाच्या कलावंतां सोबत अमित्रियान पाटील हा मराठीतला नवा देखणा नायक या चित्रपटात मुख्य भूमिका साकारतो आहे.
स्टार प्रवाहवर प्रत्येक रविवार ‘सिनेमावार’ म्हणून साजरा केला जात आहे. त्यात नव्या चित्रपटांचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर केला जात आहे. त्यानुसार येत्या २५ डिसेंबर रोजी दुपारी एक आणि रात्री साडेआठ वाजता राजवाडे अँड सन्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.