योगिनी चौक यांचे रंगचिंतन

‘त्या जीवनचक्राच्या पायाच्या गतीचा आवाज…’ हा संवाद म्हणता-म्हणता मी कुठे हरवले मला कळलेच नाही. ‘अनहद नाद’चा प्रयोग सुरू असताना, समोर प्रेक्षक बसलेले असताना आणि प्रेक्षकांसमोर सादरीकरण करत असताना माझ्या नकळत मी नेमकी कुठे बरं फिरून येते? एक चैतन्य अवस्था असते ही. माझ्यासाठी हा अनुभव नवीन असतो आणि अगदी तशीच भावावस्था असते प्रेक्षकांची सुद्धा.

एका नाटकाची ही अद्भुत प्रक्रिया! रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित, दिग्दर्शित ‘अनहद नाद- Unheard Sounds Of Universe’ हा एक प्रयोग आहे, जो नाट्यस्वरूपात साकार होतो पण आपण नेहमी जी चौकटीबद्ध नाटके पाहतो, त्यापेक्षा नक्कीच काही अर्थपूर्ण, वेगळं सांगू पाहतो. हे नाटक कलाकारांच्या ‘उन्मुक्ततेबद्दल’ भाष्य करतं, त्यांना आपला ‘आतला आवाज’ ऐकण्यासाठी प्रवृत्त करतं म्हणूनच मला हे नाटक महत्वाचं वाटतं. एका विचाराच्या अधिष्ठानावर उभं असलेलं हे नाटक मग ‘नाटक’ राहातच नाही. ते नवी अनुभूती देतं, कक्षा रुंद करतं आणि प्रेक्षकांच्या सोबतीनं कलावंताला श्रीमंत करतं.
प्रत्येक कलाकाराने ‘कलाकार’ होण्याआधी ‘माणूस’ म्हणून घडणं महत्वाचं आहे. चांगली ‘व्यक्ती’ ही चांगली ‘कलाकार’ होऊ शकते. म्हणून या नाट्यप्रक्रियेत कलाकारांच्या ‘व्यक्ती’, ‘व्यक्तिगत’ आणि ‘व्यक्तिमत्व’ घडण्याच्या प्रक्रियेवर अभ्यास होऊन मग कलाकार आणि पात्रांचा विचार होतो. मुळात या नाटकात टिपिकल पात्रयोजना नाही. ‘विचार’ एकमेकांशी संवाद साधतात. आजच्या सामाजिक-राजकीय वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तर दोन अथवा अनेक विचारांचा परस्परांशी होत असलेला संवाद आणखी महत्त्वाचा आहे! आणि त्यासाठीच व्यक्ती आणि कलाकाराची ‘तत्त्वं’ मजबूत असणं गरजेचं ठरतं. व्यक्तीची तत्त्वं मजबूत झाली की येते अस्सल बावनकशी ‘प्रामाणिकता’. ही प्रामाणिकता व्यावहारिक जगात उपयोगाला येते तेही व्यावहारिकतेच्या आव्हानांसकट! हे अध्यात्म आहे, पण तेच तर जगणं आहे. अनुभवणं आहे. हा सुंदर प्रवास कलात्मकरित्या या नाटकात मांडला आहे.
हे वेगळ्या धाटणीचं वैचारिक नाटक कलाकारांसोबत प्रेक्षकांनाही विचारप्रवृत्त करतं आणि रोजच्या धावपळीच्या आयुष्यात काही निवांत क्षण स्वतःसाठी राखून स्वतःकडे पाहण्याची नवी दृष्टी देतं.
हा प्रयोग संपताना (खरे तर तो संपत नाही. किंबहुना संपतानाच सुरु होतो!) एक प्रतिसाद असतो निःशब्द शांततेचा! निःशब्दतेचा हा प्रतिसाद प्रत्येक प्रयोगानंतर अनुभवायला मिळतो.
“थिएटर ऑफ रेलेवन्स” या तत्त्वज्ञानातील तत्त्वानुसार, ‘प्रेक्षक’ हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी आहे, त्यामुळे नाटक संपल्यावर कलाकार आणि प्रेक्षक यांतील दरी ओलांडून सर्व प्रेक्षकांना रंगमंचावर येण्याची विनंती केली जाते आणि संवाद साधला जातो. तेव्हा असंख्य प्रतिसाद हेच सांगतात की ‘आम्हाला आमचा आवाज ऐकायला वेळच नाही’ किंवा ‘आम्ही तो ऐकला, तरी ऐकून न ऐकल्यासारखं करतो.’ अनेक प्रेक्षक ‘धन्यवाद’ देतात, ‘आम्ही इथून आमचा ‘अनहर्ड’सोबत घेऊन जातोय’ असे सांगतात.
जिथे प्रेक्षक स्वतःच्या अंतर्मनाच्या दृष्टीशी अंतर्मुख होऊन संवाद साधतो आणि कलाकार व प्रेक्षकांचं मंतव्य एकमेकांशी जोडलं जातं, तिथे कलाकार म्हणून जगताना आणखीन काय पावती हवी असते? प्रेक्षक आणि कलाकार दोघे मिळून रंगभूमीला नवी पायरी, नवी उंची देतात, नवीन कक्षा निर्माण करतात. कलाकार म्हणून हेच समाधान अत्युच्च असतं!
व्यक्ती, कलाकार आणि प्रेक्षक या तिन्ही दृष्टिकोनातून होणारा समग्र विचार मला ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या तत्त्वज्ञानाच्या अभ्यासात दिसून येतो. म्हणूनच गेली दोन वर्षे सातत्याने मी या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करून समृद्ध होत आहे. या तत्त्वज्ञानाच्या रौप्यमहोत्सवी नाट्यमहोत्सवाच्या निमित्ताने ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’चे जनक मंजुल भारद्वाज यांची तीन क्लासिक नाटके ‘गर्भ’, ‘अनहद नाद’ आणि ‘न्याय के भंवर में भंवरी’ अनुक्रमे १५, १६, १७ नोव्हेंबरला श्री शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे सकाळी ११ वाजता प्रस्तुत होणार आहेत.
‘थिएटर ऑफ रेलेवन्स’च्या नाटकांत विचार, आचार, कलासत्व आणि कलात्मकता यांचा सुरेख संगम पाहायला मिळतो. ज्यांना नाविन्य अनुभवायचं आहे, कलासत्वाची ओढ आहे आणि कलात्मकतेत रुची आहे, अशा प्रेक्षकांसाठी अतिशय वेगळी अनुभूती देणारी ही नाटके आहेत. कला जगताला आणि पर्यायाने रंगभूमीला ती समृद्ध करत आहेत.