नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत
रणजित सरकार यांचे चित्र प्रदर्शन
कोलकाता येथिल सुप्रसिद्ध चित्रकार रणजित सरकार यांचे “द इन्फलेक्शन ऑफ टोन्स” हे दहावे एकल चित्र प्रदर्शन मुंबईतील वरळी येथील नेहरू सेंटर आर्ट गॅलरी २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२३ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन कला रसिकांसाठी सकाळी ११ .०० ते संध्याकाळी ७.०० वाजेपर्यंत विनामूल्य खुले आहे.

या प्रदर्शनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून द बॉम्बे आर्ट सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, ‘वाची आर्ट’च्या संचालिका सुनीता संघाई, एम डी माही एक्सपोर्टचे अध्यक्ष सौरभ अगरवाल, ई आर्ट गॅलरीचे संचालक शैलेश शेठ आणि लाईफ फोर्स हेल्थ सिस्टमचे चेअरमन सुधीर बहल हे उपस्थित राहणार आहेत. प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी, २६ सप्टेंबर २०२३ रोजी संध्याकाळी पाच वाजता मान्यवरांच्या हस्ते होईल.

रणजित सरकार यांनी आपले चित्रकलेचे शिक्षण कोलकाता विद्यापीठातून पूर्ण केले आहे. त्यांच्या चित्रांमध्ये भारतीय परंपरा आणि चित्रकलेतील सूक्ष्म बारकावे यांची सुरेख गुंफण रसिकांना पाहायला मिळते.
चांदपरा कला महाविद्यालयात शिकलेल्या रंजीत सरकार यांची चित्रे भारतीय संस्कृती, परंपरा, नृत्याविष्कार यांचे जतन करतात. त्यांच्या कलाकृती व त्यातील रंगसंगतीमध्ये चित्रकाराचे प्रभुत्व व त्यावरील छाप याची प्रचिती येते. त्यांचे चित्रांतील रंगांचे फटकारे व स्त्रीयांचे नृत्याविष्कार व त्यातील पारंगतता त्यांच्या कलाकृतीद्वारे सहज कॅनव्हासवर सळसळत्या चैतन्याची अनुभूती देते. अस्सल भारतीय चित्रविषय कलारसिकांना दृश्यात्मक अनुभूती देतात. मानवी भावभावना आणि भवताल भान याची सुरेख गुंफण रणजित सरकार यांच्या चित्रात पाहायला मिळते. त्यांच्या चित्रातले असंख्य रंग बघणाऱ्याला वसंत ऋतूतील आल्हाददायक चैतन्याचा अनुभव देतात. प्रेम आणि सहवेदना हा मानवी जगण्याचा पाया आहे. माणसातील परस्पर प्रेम, सहोदराचे उस्फुर्त चित्रण सरकार यांच्या चित्रात पाहायला मिळते. त्यामुळे कलारसिक त्यांची चित्रे पाहिल्यानंतर सकारात्मक अनुभूती घेऊनच पुढे जातो. हे सरकार यांच्या चित्रांचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे.

रणजित सरकार यांनी अनेक चित्र प्रदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला आहे. यामध्ये अनेक एकल प्रदर्शनाचा सहभाग आहे. २०१९ मध्ये नवी दिल्लीच्या इंडिया हेबिटॅट सेंटरमध्ये एकल प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. २०१८ मध्ये त्यांनी सिंगापूर येथे यशस्वी एकल चित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचबरोबर दुबई आणि अमेरिका येथे अफॉरडेबल आर्ट प्रदर्शनात त्यांनी सहभाग नोंदवला आहे.
प्रस्तुत इन्फलेक्शन ऑफ टोन्स हे प्रदर्शन रसिकांना उत्तम अशी चित्रानुभूती देणार आहे, त्यामुळे चुकवू नये असे हे प्रदर्शन आहे.

