२२ ऑक्टोबरला रहस्याचा उलगडा!
कोकणातील नाईक कुटुंब, त्यांचा वाडा, त्या वाड्यात घडणा-या गूढ गोष्टी, त्या मागचं रहस्याचं वलय आणि त्यातून मनात निर्माण होणारी भीती हा असा उत्कंठावर्धक खेळ लवकरच खल्लास होणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी ‘रात्रीस खेळ चाले’ ही झी मराठीवरील मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.


‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सर्वार्थाने वेगळी होती. मुंबई पुण्यामध्ये चित्रीकरण न होता सलग पन्नास दिवस कोकणात राहून चित्रीकरण करणारी ही बहुधा पहिलीच मालिका. यातील बहुतेक सर्वच कलाकार नवीन होते. घरापासून दूर राहत या कलाकारांनी सावंतवाडी येथे मुक्काम हलवला आणि तेथून जवळच असलेल्या आकेरी गावातील या वाड्याला आपलं दुसरं घर बनवलं. मालिकेची लोकप्रियता जसजशी वाढत गेली तसतशी या कलाकारांची आणि त्या वाड्याची लोकप्रियता वाढलीच शिवाय त्याची चर्चाही पंचक्रोशीत व्हायला लागली. हा वाडा लोकांचं आकर्षण ठरला आणि या वाड्यात चालणारं चित्रीकरण बघण्यासाठी दूरवरुन येणा-या चाहत्यांच्या गर्दीमध्ये वाढही झाली.

पांडूचा विक्षिप्तपणा, त्याचं खुळ्यागत हसणं, त्याचं बोलणं, गोष्टी विसरणं हे सर्वच प्रेक्षकांना मनापासून भावलं. विशेष म्हणजे ही भूमिका करणारा प्रल्हाद या मालिकेचा संवादलेखकही आहे. त्याच्या मते या मालिकेने एका लेखकाला चेहरा मिळवून दिला ही खूप समाधानाची बाब आहे. रहस्य हे उत्कंठा वाढवणारं असावं आणि ते वेळेत उलगडणारं असावं. ही उत्कंठा जास्त ताणणंही कधी कधी रसभंग करणारी ठरु शकते. हीच गोष्ट लक्षात घेऊन आता या मालिकेचा रहस्य उलगडण्याचा प्रवास सुरु झाला आहे. विशेष म्हणजे हा शेवट काय असेल याची कल्पना यातील कलाकारांनासुद्धा नाहीये. कारण मालिकेच्या दिग्दर्शकाने प्रत्येक पात्रासोबत एक वेगळा शेवट चित्रीत केला आहे त्यामुळे नेमका सूत्रधार कोण? याची उत्सुकता सामान्य प्रेक्षकांइतकीच या कलाकारांनाही आहे हे विशेष. या रहस्याचे एक एक पदर आता उलगडत जातील आणि येत्या २२ ऑक्टोबरपर्यंत त्यावरचा पडदा उठेल.
रात्रीस…च्या जागेवर हंड्रेड डेज
आदिनाथ कोठारे दिसणार इन्सपेक्टरच्या भूमिकेत
‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या जागेवर ‘हंड्रेड डेज’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून याद्वारे मराठी चित्रपटसृष्टीतला लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.
या मालिकेत आदिनाथ एका तरुण तडफदार इन्स्पेक्टरच्या भूमिकेत बघायला मिळणार आहे. त्याच्यासोबतीने एका अतिशय वेगळ्या भूमिकेत अभिनेत्री तेजस्विनी पंडितही असणार आहे. या मालिकेची कथा आणि इतर गोष्टी अद्याप गुलदस्त्यात असून त्याबद्दलची माहिती लवकरच झी मराठीकडून देण्यात येईल. येत्या २४ ऑक्टोबरपासून ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.