गौरवर्णीय असलेली रिना अग्रवाल आपला मॉडर्न अंदाज बाजूला ठेवून ‘झाला बोभाटा’ या सिनेमातून गावराण लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. अतिशय साधे राहणीमान असलेल्या एका खेडेगावातल्या मुलीची भूमिका ती ह्या सिनेमात साकारताना दिसणार आहे.

अजिंठा चित्रपटातून फिल्म करिअरची सुरुवात करणारी रिना अग्रवाल नेहमीच वेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांपर्यंत पोहचली आहे. वास्ताविक जीवनातले राहणीमान आणि विचारसरणींपेक्षा अतिशय वेगळे रोल तिने स्वीकारले आहेत. कोणत्याही कलाकाराला एखादी भूमिका साकारताना त्या भूमिकेसाठी आपल्या जीवनशैलीतल्या अनेक गोष्टींमध्ये बदल कराण्याची गरज असते. भूमिकेसाठी लागणारी भाषा, राहणीमान, पेहराव या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. आणि रिनाने नेहमीच तिच्या भूमिकांना ह्या सगळ्या गोष्टींद्वारे शंभर टक्के न्याय दिला आहे.
रिनाने मराठीसोबतच हिंदीतही आपली ओळख निर्माण केली. “तलाश” या हिंदी सिनेमात ती एका डॅशिंग महिला पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली होती. त्यानंतर हिंदी मालिका “एजंट राघव”मध्येही ती झळकली. पण नुकत्याच आलेल्या “कलर्स मराठी”वरील एका जाहिरातीतला तिचा टॅक्सी ड्राइव्हरचा लूक सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारा होता.
‘झाला बोभाटा’मध्ये दिलीप प्रभावळकर, संजय खापरे, कमलेश सावंत, भाऊ कदम, मयुरेश पेम यांच्यासोबत रीना मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता ‘झाला बोभाटा’ तला हा तिचा गावराण लूक प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडतोय हे लवकरच कळेल.