‘डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन’
पद्म्श्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या जीवनपटावर आधारित ‘डॉ. तात्या लहाने… अंगार पॉवर इज विदीन’ या सिनेमातील रिले सिंगिंग या उपक्रमामुळे सिनेमाबाबतची उत्कंठा अधिक वाढली आहे.

डॉ लहाने यांच्या कारकिर्दीला मानवंदना देण्यासाठी सात वर्षाच्या कावेरी सुरवाडकर (जळगाव) पासून ते ७० वर्षांचे निवृत्ती वानखेडे (नाशिक) अशी ३०० गायकांची फौज सज्ज झाली आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात १६ ऑगस्ट रोजी रिले सिंगिंगचे रेकॉर्ड प्रत्यक्षात होणार आहे. त्याची नोंद घेण्यासाठी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचे पदाधिकारी येणार आहेत. काळोखाला भेदून टाकू… जीवनाला उजळून टाकू!… विराग यांनी लिहिलेलं १०८ शब्दांचं हे गाणं तब्बल ३०० गायक गाणार असून सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत एक शब्द एक गायक या पद्धतीने हे गाणे सादर होणार आहे आणि त्यामुळेच हा प्रयोग नेमका कसा यशस्वी होईल याबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली आहे. विराग यांच्या कठोर परिश्रमातून साकारला जाणारा हा सिनेमा ८ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.