दिग्दर्शनाची प्रभावी किमया
मिस्टर केलर यांच्या घरात असलेली चिमुकली एका जीवघेण्या आजारातून वाचते. दुसऱ्याच क्षणी ती अंध, मुकबधीर झाल्याचे ध्यानात येते. पडदा उघडताबरोबरच असे क्षणाक्षणाला उत्सुकता वाढवणारे, अस्वस्थ करणारे, उत्कंठा वाढवणारे प्रसंग नाटय़मयरीत्या घडत जातात आणि रसिकांना खिळवून ठेवतात. या सर्वांगसुंदर नाट्याविष्काराचे नाव आहे ‘किमयागार’!
घरातील लहान मुलांभोवती कुटुंबातील साऱ्या व्यक्तिरेखा स्वत:ला गुंतवून घेत असतात. त्यांचा गोंधळ, हट्ट, रुसणे, फुगणे साऱ्या भावभावनांचे कोडकौतुक करत फेरा धरत असतात. तेच लहान मुल रडत असल्यास, आजारी पडल्यास कुटुंबीय अस्वस्थ होतात. असेच एक अपंगत्व अमेरिकेतील हेलन केलर या मुलीला आले. तिला दिसत नाही, ऐकायला येत नाही, बोलताही येत नाही. तरीही ती खोडकर. सारे घर डोक्यावर घेते. नको ते उपद्व्याप करते. अक्षरश: उन्माद मांडते. तिच्या अपंगत्वावर सारे प्रयत्न करून झालेले असतात. सर्व उपचार हरले असतात. यात सहा वर्ष उलटून जातात. जसजसे वय वाढते, तिचा हट्टीखोरपणाही वाढतच जातो. त्याचा वैताग केलर कुटुंबीयांना होतो. सर्व प्रयत्न झाले. आता काही करायला नको, असे म्हणता म्हणताच केलर कुटुंबीय एका डॉक्टरला हेलनच्या उपचारार्थ पत्र लिहितात आणि या घरात दाखल होते अॅनी सुलेवान ही शिक्षिका. त्यानंतर सुरू होते उपचारपद्धती, अॅनीने घेतलेला घराचा ताबा, तिचे प्रयत्न, त्याला मिळणारे यशापयश या साऱ्यांभोवती रसिक एकाग्र होतात. त्यात गुंतून जातात.
हेलन केलर यांच्या ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ या आत्मचरित्रवर आधारित ‘द मिरॅकल वर्कर’ या नाटकाने अमेरिकन नाटय़सृष्टी गाजवली. १९९३ साली या कथेचे वि.वा. शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर या दोन साहित्यकारांनी मराठीकरण केले आणि त्या नाटकाला नाव दिले ‘किमयागार’.
२०१४मध्ये संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी या नाटकाचे दिग्दर्शन करून, रंगभूमीवर आणले होते. आता पुन्हा हर्षदा शिंदे, स्वरा सुब्रमणियन-शिंदे, संदीप सावंत, हेमंत धुरी यांच्या स्वरानंद आणि व्ही.आर. प्रॅाडक्शनने या नाटकाची निर्मिती केली असून, पुन्हा नव्याने संपदाच्या दिग्दर्शनात ही ‘किमया’ साधली गेली आहे.
हे नाटक जगप्रसिद्ध लेखिका आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेल्या हेलन केलर यांच्या बालपणातील जगण्यावर आधारित आहे. तिच्या या जगण्यातील संघर्षात महत्त्वाचा वाटा आहे अॅनी सुलेवान या शिक्षिकेचा. या दोन पात्रांत संवाद आहे तो शरीरभाषेचा. सुलेवानची ही शरीरभाषा हेलनला, केलर कुटुंबीयांसह प्रेक्षकांनाही एकएक धक्के देत थक्क करणारी आहे. प्रचंड ऊर्जा घेऊन साकारलेली ही भूमिका संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी यादगार केली आहे. एकही संवाद नसताना अंध-मुकबधीर म्हणून नाटकभर हेलन केलरची भूमिका साकारणारी तृष्णिका शिंदेने तर कमालीचा एनजिर्टिक अभिनय केला आहे.
हेलनच्या कुटुंबातील आईची भूमिका साकारणारी पल्लवी वाघ – केळकर, वडील कॅप्टन केलरची भूमिका साकारणारे अंगद म्हसकर, हेलनचा भाऊ जेम्स (तेजस डोंगरे), वैजयंती शिंदे आणि पर्सी (अनय पाटील) या साऱ्यांनी आपापल्या भूमिकांना यथोचित न्याय दिला आहे.
या नाटकाच्या तांत्रिक बाजू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या १८८७च्या काळात घेऊन जाणाऱ्या आहेत. त्यातील परिक्षित भातखंडे यांचे नाटकाला त्या काळाला आणि प्रसंगाला साजेसे पाश्र्वसंगीत, योगेश केळकर यांनी वातावरण निर्माण होईल अशा रंगछटा वापरल्या आहेत. नेपथ्यातूनदेखील जुन्या कालखंडाचा बॅकड्रॉप साकारला गेला आहे.
हे नाटक १८८७च्या काळातील असले तरी मुलांच्या संगोपणाविषयी, त्यांच्यात असाव्या लागणाऱ्या शिस्तीविषयी आणि कुटुंबीयांच्या भावविश्वावर प्रभावी भाष्य करणारे आहे. नाटकाची गोष्ट आजही आपल्या अवती-भवतीच घडते, असे वाटते. तंत्रज्ञानाने जग पुढे गेले असले तरी कुटुंबाचे भावविश्व तेच आहे. आईची मुलीविषयी असणारी माया तशीच आहे. त्यामुळे हे नाटक आजचे वाटते. आजच्या काळाशी परिणामकारक संवाद साधते. नाते विणते. म्हणूनच असेल कदाचित ही कलाकृती अजरामर ठरली आहे.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग गुरुवारी २० ऑक्टोबरला ठाण्यातील गडकरी नाटय़गृहात झाला. किमयागार हे नाटक कुठल्याही संवेदनशील रंगकर्मींना पुन्हा पुन्हा करावेसे वाटणारे आहे, याचीच प्रभावी प्रचिती संपदा जोगळेकर कुळकर्णी यांच्या दिग्दर्शनातून येते.
श्रेयनामावली
‘किमयागार’
निर्मिती : स्वरानंद आणि व्ही.आर. प्रोडक्शन
लेखक : वि.वा.शिरवाडकर आणि सदाशिव अमरापूरकर
दिग्दर्शक : संपदा जोगळेकर-कुळकर्णी
कलावंत : संपदा जोगळेकर-कुळकर्णी, तृष्णिका शिंदे, अंगद म्हसकर, पल्लवी वाघ-केळकर, तेजस डोंगरे, अनय पाटील, वैजयंती शिंदे
-रंगमैत्र
rangmaitra@gmail.com