‘कलर्स मराठी’वर ‘गणपती बाप्पा मोरया’
‘कलर्स मराठी’वरील ‘गणपती बाप्पा मोरया’ मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी–सिद्धीचे आगमनदेखील या मालिकेत झाले आहे. मोठ्या गणेशाचं कैलासावर आगमनदेखील झाले आहे, आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन. परंतु त्या गाथेला सुरुवात होण्याआधी एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्रीगणेशांच्या भावी वधुंची परिक्षा घेतली जाणार आहे. पृथ्वीलोकात राहणाऱ्या मनुष्यकुळाचे संस्कार घेऊन वाढलेल्या रिद्धी आणि सिद्धी मुळात ब्रम्हकन्या आहेत. देवकुळातल्या ह्या कन्यांना म्हणजेच आपल्या भावी सुनांना स्वत: आदिशक्ती दृष्टांत देणार आहेत.
या दृष्टांतातून आदिशक्ती दोघींना त्यांच्या भावी जीवनासाठी आशीर्वाद देणार आहे. असं लवकरच आपल्याला गणपती बाप्पा मोरया या मालिकेतील पुढच्या काही भागात पाहायला मिळणार आहे.
मनुष्यलोक असो वा देवलोक अपत्यांचा सुखाचा विचार प्रत्येक माता करते. मग आदिशक्ती त्याला अपवाद कशा असणार ? आदिशक्ती गणेशाच्या भावी सुनांना केवळ दृष्टांतच देणार नाहीत तर भूलोकावर येऊन त्यांच्या सान्निध्यात राहून त्या रिद्धी सिद्धीची वधूपरीक्षा सुध्दा करणार आहेत. कलर्स मराठीवरील गणपती बाप्पा मोरया मालिकेतील पुढील कथानकातून प्रेक्षकांना दैवत्व आणि मनुष्यस्वभावाची सुरेख गुंफण पाहायला मिळणार आहे.