सलमान खानसह अवतरले तारांगण!!
अभिनेते, निर्माता – दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या आगामी ‘रुबिक्स क्यूब’ या सिनेमाचा फर्स्ट लुक आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याचं विशेष आकर्षण होतं ते यारोंका यार ‘सलमान’ खान याची उपस्थिती. महेश मांजरेकर यांचा जिगरी मित्र असलेल्या ‘सलमान खान’च्या हस्ते सिनेमाच्या संगीताचं अनावरण करण्यात आलं. ‘सलमान’ची मैत्रीण ‘युलिया वंतूर’ हिने या सोहळ्यात सादर केलेलं नृत्यही उपस्थितांची दाद मिळवून गेलं. या भव्य सोहळ्यासाठी मराठी सृष्टीतलं अवघं तारांगण अवतरलं होतं.

मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी, सुरभी भोसले आणि सिद्धांत मुळ्ये या कलाकारांसह किरण यज्ञोपवीत, संदीप पाठकसारखे अनुभवी आणि मेधा मांजरेकर व महेश मांजरेकर या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. युरोपचं निसर्गसौंदर्य, कलाकारांचा अभिनय, सिनेमाची कथा आणि भव्य संगीत ही या सिनेमाची बलस्थानं आहेत. या सिनेमाच्या माध्यमातून नव्या दमाचा संगीतकार विशाल मिश्रा हा मराठी चित्रसृष्टीमध्ये पदार्पण करत आहे.
सिनेमाचे निर्माते अविनाश अहाले याबद्दल बोलताना सांगतात की, ‘मराठी सिनेमा बदलाच्या दिशेने जात असताना त्यात माझा हातभार लागणं हे मी माझं सुदैव समजतो.’ तर ‘आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा काही तरी वेगळं करावं ही माझी इच्छा होती. नशिबाने तशी कथा लिहिली गेली आणि ती कथा सत्यात उतरवण्यासाठी निर्मात्याचं पाठबळही मला मिळालं. हा सिनेमा माझ्यासाठी खूप महत्वाकांक्षी आहे असं मत महेश मांजरेकर यांनी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी व्यक्त केलं.
अहालेस मूवी मॅजिक आणि महेश मांजरेकर मूवीस यांची निर्मिती आणि जी बी एंटरटेन्मेन्ट प्रा लि यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची भव्यता बहारदार लोकेशन्स, ग्रँड म्युझिक आणि दमदार स्टारकास्ट आणि सलमानच्या खास शुभेच्छांमुळे ‘रुबिक्स क्युब’ची चर्चा सर्वत्र सुरु आहे