स्टार प्रवाहवर ‘गोठ’ ही नवी मालिका सुरु होणार असून, राधा या मुख्य व्यक्तिरेखेभोवती ही मालिका गुंफण्यात आली आहे. टी भूमिका साकारत आहे फिजिओथेरपिस्ट असलेली रुपल नंद.
इंजिनीअरिंग सोडून, चांगली नोकरी सोडून अभिनयाकडे वळलेली अनेक मोठी नावं मराठी इंडस्ट्रीत आहेत. त्यात आता रूपल नंदचीही भर पडली आहे. रूपलनं पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून फिजिओथेरपीचं शिक्षण घेतलं आहे. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. पुण्यात शिकताना तिनं पुरुषोत्तम करंडकसह बऱ्याच एकांकिका स्पर्धा केल्या. फिजिओतरीचं शिक्षण पूर्ण झाल्यावर तिला आपली आवड गप्प बसू देईना. त्यामुळे तिनं फिजिओथेरपी बाजूला ठेवत आपल्या आवडीला प्राधान्य दिलं आहे. एका ब्युटी कॉन्टेस्टमध्ये बेस्ट पर्सनॅलिटीचं पारितोषिक मिळाल्यानंतर तिचं आयुष्यच बदललं.
अभिनयाच्या क्षेत्रात येण्याबद्दल रुपल म्हणाली, ‘फिजिओथेरपीचं शिक्षण झाल्यावर मी नाटक करण्यासाठी संधी शोधत होते. त्याच दरम्यान त्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये निवड झाली. ब्युटी कॉन्टेस्टला सतीश राजवाडे परीक्षक होते. त्यांनी माझं काम पाहून मला ‘मुंबई पुणे मुंबई २’मध्ये भूमिका दिली. त्यानंतर मी ‘अँड जरा हटके’ हा चित्रपटही केला. ‘गोठ’ या मालिकेतली राधा ही व्यक्तिरेखा मला फार आवडली. मालिकेचा विषयही छान होता. त्यामुळे माझं मालिकेत पदार्पण झालं. या मालिकेच्या निमित्तानं मान्यवर कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळतेय. पुढे जाऊन मला नाटक, मालिका, चित्रपट या सर्व माध्यमांध्ये काम करायचं आहे. ‘फिजिओथेरपी बाजूला ठेवून अभिनयाच्या क्षेत्रात येण्याच्या निर्णयाला आई – बाबांनी पूर्ण पाठिंबा दिला. अभिनय करत असले, तरी मला स्वत:चं क्लिनिक सुरू करायचं आहे,’ असंही तिनं सांगितलं.