सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्टचा उपक्रम
सदाशिव अमरापूरकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी प्रत्येक मराठी कला रसिकाच्या मनात स्वतःचं एक अबाधित स्थान निर्माण केलं. सिने सृष्टीला ग्रामीण भागातल्या टॅलेंटच्या ताकदीची जाणीव करून देणारा या सृष्टीतला एक प्रमुख शिलेदार. चित्रपटसृष्टीची काहीही माहिती नसताना, कोणाचीही मदत नसताना, स्वतःचा मार्ग काढणं हे किती कठीण असतं याची जाणीव स्वतः प्रस्थापित झाल्यानंतर सुद्धा अमरापुरकरांना होती. अमरापूरकर गेल्यानंतर त्यांच्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कलाकारांबद्दलच्या कळवळ्याला पुढे नेत, एक मूर्त स्वरूप देण्याचं काम सदाशिव अमरापूरकर मेमोरिअल ट्रस्ट सातत्याने करत आहे. यातलंच एक पाऊल म्हणजे ‘साधन’ हा उपक्रम.
‘साधन’मधून चांगली कथानके घेऊन चित्रपट निर्मिती करू इच्छीणाऱ्या प्रोजेक्टना लागणाऱ्या equipments ची स्कॉलरशीप देण्यात येणार आहे.
विनोद तावडे यांनी सांगितले की, ग्रामीण भागात अभिजात कलेची कमतरता नाही.. पूर्वी कथा कविता यातून आपली सर्जनशीलता जगासमोर मांडली जायची… पण आता डिजिटल जगाबरोबर चालताना दृक्श्राव्य माध्यम वापरून जगासमोर आपल्या मनातली गोष्ट सांगायचं प्रमाण वाढलं आहे… पण जागतिक स्पर्धेत तांत्रिक बाबींमुळे हे कलाकार मागे पडतात. कारण चांगली साधन सामुग्री या कलाकारांकडे नसते.. किंवा व्यावसायिक साधन सामुग्री वापरण्यासाठी लागणारे पैसे यांच्या कडे नसतात. अश्या चांगल्या आणि अभिजात कथानकांना आम्ही ही मदत देणार आहोत.

सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट गेली तीन वर्ष, अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील शाळा व कॉलेज या मधून चित्रपट रसग्रहण कार्यशाळा तसेच चित्रपट बनविण्याचे प्रशिक्षण कार्यशाळा मोफत घेत आहे. विनोद तावडे, श्रीमती सुनंदा अमरापूरकर, राजाभाऊ अमरापूरकर, डॉ. आनंद नाडकर्णी, डॉ.उमा कुलकर्णी, विनोद शिरसाठ आणि रिमा अमरापूरकर हे या ट्रस्टचे ट्रस्टी आहेत.
११ मे २०१८ रोजी अमरापुरकरांच्या जयंतीचे औचित्य साधून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणारं असून, ज्यांना या उपक्रमाचा भाग व्हायचे आहे किंवा त्याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना connect@sadashivamarapurkar.org या इमेलशी संपर्क साधून सर्व माहिती मिळेल.