नेसको आयटी पार्कमध्ये रंगला सोहळा
जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स सई ताम्हणकरसाठी विशेष होता. या फिल्मफेअर मध्ये सईला दोन चित्रपटांसाठी नामांकन होती.. उत्कृष्ट अभिनेत्री (वजनदार) आणि उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री( फॅमिली कट्टा). सई ताम्हणकरला ‘फॅमिली कट्टा’साठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सईच्या सिनेमातील वाटचालीमधला हा पहिला फिल्मफेअर अवॉर्ड आहे.


सहायक अभिनेत्रीचा अवॉर्ड स्वीकारताना सई खूप भारावून गेली होती. या बाबत सई म्हणाली, ‘हो हा माझा पहिला फिल्मफेर आहे आणि मला खरंच खूप छान वाटतंय. हा फिल्मफेर आणखी खास आहे कारण मला हा अवॉर्ड ‘फॅमिली कट्टा’साठी मिळाला आहे. हा चित्रपट माझ्यासाठी अनेक पर्सनल कारणांसाठी खास होता, खूप जवळचा होता आणि त्या चित्रपटासाठी पुरस्कार मिळणं आणि ते ही पहिला फिल्मफेर मिळणं हे तर नक्कीच फार आनंददायी आहे. पण मी या सेलेब्रेशनवर जास्त वेळ रमणार नाहीये, पुढच्या कामासाठी लगेच तयार होणार आहे. इनफॅक्ट माझा डेली रुटीन सुरु झालंय.’
२०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फॅमिली कट्टा’ या चित्रपटात सईने ‘मंजू’ नावाची भूमिका साकारली होती. चित्रपटातला तिचा वावर अवघा काही मिनिटांचा असला तरी तिने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने कायम लक्षात राहिलं असा प्रभाव प्रेक्षकांवर नक्कीच पाडला होता. आणि या तिच्या भूमिकेसाठी तिला उत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.