‘तुला शोधत शोधत घडतीच आहे!’
‘फॅमिली कट्टा’ चित्रपटाच्या निमित्ताने लिहिले बाबांना पत्र
बोल्ड आणि बिनधास्त अशी छवी असलेली मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्या अभिनय कौशल्याचा संपूर्ण महाराष्ट्र दिवाना आहे. मोठ्या पडद्यावर बोल्ड आणि बिनधास्त दिसणारी सई खऱ्या आयुष्यात तितकीच इमोशनल देखील आहे. 7 ऑक्टोबरला रिलीज होणारा सईचा आगामी चित्रपट ‘फॅमिली कट्टा’ हा कुटुंब आणि नातेसंबंधांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात सईने मंजू म्हणजेच सबनीस कुटुंबातील मुलीची भूमिका साकारली आहे. चित्रपटात वडील आणि मुलीचे नाते रंगवत असताना सईची खऱ्या आयुष्यातील तिच्या बाबांसाठी असलेली भावनिक ओढ दिसून येते. स्वतःच्या बाबांशी हे इमोशन्स शेअर करण्यासाठी सईने तिच्या बाबांना एक पत्र लिहिले आहे. सईने पत्रातून घातलेली ही भावनिक साद…
“प्रिय पप्पा,
मम्माच्या माहितीप्रमाणे मी 6 महिन्यांची असताना Signal चा रंग हे कारण ठरलं आपल्या मैत्रीचं! ओळखीचं! मी 6 महिन्यांची होई पर्यंत तू बोटीवरच होतास. मी मोठी होत गेले तसं तू कधीच, कोणतीच कासार माझ्या लाडात पडू दिली नाहीस. तुझ्या उत्तम स्वयंपाक करण्याचा आणि कुठलंही काम हाती पडलं तर ते न लाजता करण्याचा रंग तंतोतंत माझ्यात उतरला आहे. बोटीवर परत जायला जेव्हा वेळ असायचा तेव्हा तू टॅक्सी चालवायचास मुंबईत. तुझा बिल्ला मी पाहिलाय. कळायला लागलं तेव्हा समजेना या गोष्टीला कसं react व्हावं? बेचैन व्हावं कि चिंतीत? तेव्हा passion वगैरे शब्द माझ्या समजेच्या शब्दकोशात नव्हते. नंतर उमगलं, driving was your passion! मी आज तुला अभिमानाने सांगू इच्छिते कि पुलावरून नदी ठोकणारा आणि सरसर नदी पार करणाऱ्या तुझ्या मुलीत तुझा adventurous रंगही उतरलाय आणि एकजीव झालाय. बाकी खरं सांगायचं तर इतर सर्व रंग माझे मीच शोधलेत, धडपडत आणि शिकत.
तुझ्याशी खूप बोलायचं राहून गेलं ही सल खूपदा बोचते. पण कधीकधी असं वाटतं, जेवढं घडलं तेवढंच घडायचं होत. त्याला पूर्णत्वाचा हट्ट का? माझ्या अपूर्ण गोष्टी मी माझ्या पात्रांमध्ये शोधल्यात नेहमीच. खुपश्या सापडल्याही, त्यांना पूर्णत्व मिळालंही. तू मात्र कधी सापडलाच नाहीस पण मी ही शोधणं थांबवलं नाही. त्या माझ्या अपूर्ण, सलणाऱ्या, आवडणाऱ्या आणि तुला-मलाच माहिती असलेल्या गोष्टी “फॅमिली कट्टा”च्या निमित्तानं पुन्हा एकदा कुशीत घेतल्या मी. तेवढीच गलबलले जेवढी खऱ्या आयुष्यात गलबते. तुला शोधत राहण्याचं काम मी प्रामाणिकपणे करत आहे. इथेही सापडलाच नाहीस तर अपूर्णत्व हीच आपल्या नात्याची पूर्णता आहे असं मानेन. तू असतास तर? अशी भावनिक आणि भाबडी तक्रार मला नाही करायची. त्यापेक्षा माझ्याकडे जे आहे ते मी नीट जपून ठेवेन. बरं-वाईट सगळं! मला कळत नकळत घडवल्याबद्दल Thank You ! तू नसतानाही मी घडतेच आहे. कधी तू नाहीस म्हणून, तर कधी तुला शोधत शोधत.”
बेफिकीर व बिनधास्त असलेली सई तिच्या बाबांबद्दल किती इमोशनल आहे हे तिने लिहिलेल्या पत्रातून सहज कळून येते. वडील हयात असताना त्यांच्याशी खूप साऱ्या गोष्टी बोलायच्या राहून गेल्याची खंत या पत्रातून स्पष्ट दिसून येते पण वडील आणि मुलीच्या अपूर्ण असलेल्या नात्याला फॅमिली कट्टा या चित्रपटाने पूर्णत्व दिलं. या पत्रातून व्यक्त झालेल्या सईची हि इमोशनल बाजू चित्रपटातून देखील प्रेक्षक अनुभवतील.