वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर २ ऑक्टोबरला
मोठ्या पडद्यावरुन मराठी मनांवर अधिराज्य गाजवणारा ‘सैराट’ चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीस येतोय छोट्या पडद्यावरून. येत्या २ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता झी मराठीवरुन ‘सैराट’चा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रिमियर होणार असून, या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी ही खास पर्वणी ठरणार आहे.

या चित्रपटातील आर्ची-परश्याच्या प्रेमकथेने सर्वांनाच भुरळ घातली तर यातील गाण्यांची सर्वांनाच धुंदी चढली. नागराज मंजुळे यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन आणि झी स्टुडिओजची उच्चत्तम निर्मितीमूल्ये या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांना मनापासून भावला. या चित्रपटाने आपल्या लोकप्रियतेची पताका साता समुद्रापार फडकवली. हिंदी चित्रपटसृष्टीतील बड्या बड्या दिग्दर्शक कलाकार मंडळींना या चित्रपटाने आपल्या प्रेमात पाडलं. एकंदरीत मराठी चित्रपटसृष्टीसाठी यशाचं एक दारच नाही तर एक भव्य दालन उघडून दिलं. आज मराठी चित्रपट म्हणजे ‘सैराट’ आणि यश म्हणजे ‘सैराट’ असं नवं समीकरण तयार झालं.

मोठ्या पडद्यावर तुफान लोकप्रियता मिळवल्यानंतर हा चित्रपट छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. काही चित्रपट असे असतात ज्यांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद हा काही औरच असतो. म्हणजे हे चित्रपट कितीही वेळा बघितले तरी त्यातली गंमत कमी न होता ती वाढतच जाते. ‘सैराट’सुद्धा असाच एक चित्रपट आहे. हा चित्रपट सिनेगृहात होता त्याही वेळी तो पुन्हा पुन्हा बघणा-यांची संख्या खूप मोठी होती. अनेकांनी तर याबद्दलचे विक्रमही रचले. लोकांचं प्रेम आणि लोकाश्रय प्राप्त झालेली एखादी कलाकृती कशी लोकप्रिय होते याचं ‘सैराट’ हे उत्तम उदाहरण.
आकाश ठोसर, रिंकु राजगुरु, छाया कदम, अरबाझ शेख, तानाजी गलगुंडे, सुरेश विश्वकर्मा यांच्या अभिनयाने सजलेला, अजय-अतुल यांच्या झिंगाट गाण्यांनी सर्वांना वेड करणारा आणि नागराज मंजुळे यांच्या दिग्दर्शनाची जादू पसरवणारा सैराट या चित्रपटाचा हा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर बघायला विसरू नका येत्या २ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. फक्त झी मराठीवर.