महिला दिनानिमित्त दिलं प्रोत्साहन
महिला दिनाचं औचित्य साधून मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिका संगीता सचिन अहिर यांनी महिला कामगारांना, आजच्या दिवशीही सुट्टी नसल्यामुळे त्यांचा हा दिवस खास करण्यासाठी त्यांच्या कार्यस्थळी त्यांना भेट देऊन हा महिला दिन साजरा केला. यावेळी बोलत असताना आपल्या स्वप्नांसाठी लढत एकमेकांच्या साथीनं पुढे जाण्याचं आवाहन त्यांनी या महिलांना केलं. तर “संसाराचा गाडा हाकताना स्वत:कडे दुर्लक्ष न करता आपल्या तब्येतीची काळजी घेणं ही तितकंच गरजेच असल्याची जाणीवही” संगीता अहिर यांनी महिला मिलवर्कर्सना करून दिली.
महिला दिन हा स्त्री कर्तृत्त्वाला सलाम करण्याचा दिवस… या दिवशी तिच्यासाठी काहीतरी खास करून तिला खुश करण्यासाठी प्रत्येकाचीच धडपड सुरू असते. कुठे तिच्यासाठी स्पेशल ऑफर्स ठेवल्या जातात तर कुठे सिनेमांची तिकीटं फुकट वाटली जातात… ‘ती’चं आपल्या आयुष्यात असणारं स्थान… तिचं महत्त्व तिला पटवून देण्यासाठीचा हा सगळा अट्टाहास… प्रत्येक व्यक्ती हा दिवस माझ्यापरीने कसा चांगला होईल… या दिवशी काय स्पेशल करून ‘ती’ला खुश करता येईल… याचा आराखडा बांधत असतं… अशातच आपली कारकीर्द सक्षमपणे घडवणाऱ्या एखाद्या महिलेकडून प्रेमाची भेट आणि प्रोत्साहनपर शब्द कानी पडणं केव्हाही उत्साहवर्धक… हाच उत्साह अनुभवला दादरच्या टाटा मिल्समध्ये काम करणाऱ्या महिलांनी…
यावेळी अहिर म्हणाल्या, “स्त्रीच्या कर्तृत्त्वाला सलाम करण्यासाठी केवळ एक दिवस पुरेसा नसून ३६५ दिवस राबणाऱ्या ‘तिचा’ आदर नेहमीच आपल्या मनात असणं गरजेचं आहे, असं त्या म्हणाल्या. २०० महिला मिलवर्कर्स यावेळी दादरच्या टाटा मिल्समध्ये उपस्थित होत्या. त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून संगीता अहिर यांनी आपल्या प्रोत्साहनपर भाषणानंतर प्रेमाची भेटवस्तू देऊन या सगळ्यांचा सत्कार केला.
मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संचालिकेबरोबरच मंगलमूर्ती फिल्म्सची घोडदौड पाहणाऱ्या संगीता अहिर यांनी वाह! लाईफ हो तो ऐसी, गुड्डू रंगीला, सिंह साहब द ग्रेट, गली गली चोर है या सिनेमांची निर्मिती केली तर चित्रपट वितरण क्षेत्रातही त्यांनी आपलं एक वेगळं अस्तित्त्व निर्माण केलं आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोलमाल अगेन या सिनेमाची सहनिर्मितीही त्यांनी केली होती.