अंतिम फेरी ७ एप्रिलपासून मुंबईत होणार
संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे व्यावसायिक नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच संपली असून, निवडक नाटकांची अंतिम फेरी ७, ८ व ९ एप्रिल २०१८ रोजी यशवंत नाट्य मंदिर, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केली आहे.
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा व कलाकृतींचा यथोचित सन्मान करणाऱ्या संस्कृती कलादर्पण पुरस्काराने मनोरंजन विश्वात आपली विशेष मोहोर उमटवली आहे.
संस्थेने घेतलेल्या व्यावसायिक नाटय़ स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत मुंबई व पुणे येथील एकूण २५ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी पाच नाटकांची निवड करण्यात आलेली आहे. यात वेलकम जिंदगी (त्रिकूट,मुंबई), संगीत देवबाभळी (भद्रकाली प्रॉडक्शन्स), अनन्या (सुधीर भट थिएटर्स), माकड (श्री स्वामी समर्थ आर्टस), अशीही श्यामची आई (सुधीर भट थिएटर्स) या नाटकांचा समावेश आहे.
या विभागासाठी प्राजक्ता कुलकर्णी–दिघे, प्रकाश निमकर, संजय डहाळे, चंद्रशेखर सांडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. काही तांत्रिक कारणास्तव या पाच नाटकांपैकी कोणाला नाटकाचा प्रयोग करणे शक्य नसेल तर त्यासाठी परीक्षकांनी फायनल डिसीजन (जाई वल्लरी फॉर यू प्रोडक्शन), स्टॅच्यु ऑफ लिबर्टी (अद्धैत थिएटर) या दोन नाटकांची निवड केली आहे. यापैकी एक नाटक सादर होईल. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्य संस्थांचे संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष -संस्थांपक चंद्रशेखर सांडवे यांनी अभिनंदन केले आहे.