फाऊंडेशनने केला स्त्री कर्तृत्वाचा गौरव
सावली फाऊंडेशनने महिलांमधील खऱ्याखुऱ्या देवींना नुकतेच नवशक्ती- नवचेतना पुरस्काराने गौरविले. हा पुरस्कार समाजातील विविध क्षेत्रातील नऊ महिलांना जेष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळांच्या हस्ते भांडुप येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव उपस्थित होते. बिकट परिस्थितीला शरण न जाता, तिच्याशी दोन हात करुन विजय मिळविणाऱ्या अशा या महिला आहेत. नवऱ्याने पैशासाठी विकलेली पण हिंमतीने देहविक्रीच्या व्यवसायातून बाहेर पडून स्वत:चं चरित्र लिहू पाहणारी किरण कुमारी चुटकी सिंग, स्वत:च्या दोन्ही मुलींना शाळेतून काढून त्यांच्या आवडीप्रमाणे शिक्षण देणारी, ज्यामुळे एकीला थेट अमेरिकेच्या एमआयटी संस्थेत प्रवेश मिळाला तर दुसरी फोटोग्राफी करतेय अशा मुलींची आई सुप्रिया जोशी, सेरेब्रल पाल्सी आजाराने ग्रस्त असणाऱ्या स्वत:च्या मुलीचं संगोपन करताना अशा आजाराने त्रस्त असणाऱ्या इतर मुलांसाठी ‘उमंग ट्रस्ट’ सुरु करणाऱ्या अश्विनी कराडे, शून्यातून सुरुवात करत औद्योगिक साम्राज्य उभारणाऱ्या आरती कांबळे, भारतातील कलांना उजाळा देण्यासाठी युट्यूबर फोक
टॉकीज नावाने वाहिनी सुरु करणारी प्रणाली निमकर-देसाई, कर्तव्यदक्ष आणि कवी मनाच्या महिला पोलिस अधिकारी सुजाता पाटील, पत्रकारिता क्षेत्रात आव्हानात्मक अशा गुन्हेगारी वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकार मनिषा म्हात्रे, नुकत्याच राज्यस्तरीय ज्युडो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी ११ वर्षांची चिमुरडी सिद्धी सुनिल घाडगे, मराठी नाट्य- सिनेमा- संगीत अल्बम ही तिन्ही क्षेत्रे पादांक्रांत करणारी अभिनेत्री सारा श्रवण या सगळ्या अनोख्या नारीशक्तीला सावली फाऊंडेशनने गौरविले.
या कार्यक्रमात जातपंचायतीशी संघर्ष करुन स्वयं संघर्ष सामाजिक संस्थेचा समर्थ पर्याय देणाऱ्या दुर्गा गुडिलु या तरुणीचा विशेष गौरव करण्यात आला. मुलींनी स्वत:ला घडविले पाहिजे, नाती जपली पाहिजेत असे सांगत ढासळत्या कुटुंब संस्थेविषयी सिंधुताई सपकाळ यांनी चिंता व्यक्त केली. देश, आई- वडिल यांना सर्वोच्च प्राधान्य दिले पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत जीव द्यायचा विचार करु नका तर इतरांसाठी, समाजासाठी आपला जीव सत्कारणी लावा, असे सिंधुताई सपकाळांनी तरुण पिढीला आवाहन केले.
सावली फाऊंडेशनने या नारीशक्तीचा सन्मान केला नाही तर या सगळ्यांनी उपस्थित राहून सावली फाऊंडेशनचा गौरव केला आहे, अशी कृतज्ञता गणेश जाधव यांनी व्यक्त केली.
समाजामध्ये वावरणाऱ्या आपल्यासारख्याच महिला कशाप्रकारे धाडस आणि साहसाने प्रवाहाविरोधात कार्य करतात हे समाजासमोर आणण्यासाठी सावली फाऊंडेशनने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते असे सावली फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश जाधव यांनी सांगितले. यावेळी या नारीशक्तीला प्रोत्साहीत करण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.