२६ कलाकारांच्या कलाकृतींचे
१ डिसेंबरपासून चित्र-शिल्प प्रदर्शन
एक्सपोपीडिया या संस्थेतर्फे “अमलगमेशन ११” या प्रदर्शनाचे आयोजन मुंबई येथील सिमरोझा आर्ट गॅलरी, ७२ भुलाबाई देसाई रोड, मुंबई येथे दि १ ते ४ डिसेंबर २०२३ दरम्यान करण्यात आले आहे. या प्रदर्शनात विविध मान्यवर चित्रकारांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती कला रसिकांना पाहता येतील. या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्ये सांगणाऱ्या विविध कलाकृती एकाच छताखाली प्रेक्षकांना पाहता येतील.
या समूह प्रदर्शनात प्रकाश बाळ जोशी, विनोद व्यंकपल्ली, ओम स्वामी, सोनाली कोरडे, आसित कुमार पटनाईक, योगिनी शर्मा, उमेश कुमार, स्मिता साहू, बी.आर. पंडित शालू परसरामपुरिया, माया मेनन, श्यामा नदीमपल्ली,राखी शाह, मिनी सुबोथ, कादंबरी मेहता, प्रा.मंगल गोगटे, अलका पांडे, डॉ. प्रिया याबलुरी, सीमा हेडाऊ, प्रियल ठक्कर, सेल्वे सिंग, कौशल पारीख, साक्षी बबारिया, रचना आघा, अविजित रॉय, कविता भंडारी या चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित होणार आहेत. या प्रदर्शनाच्या संयोजक अपरिमिता सप्रू या आहेत.
प्रदर्शनाचे उद्घाटन दि १ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता होईल. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विख्यात वास्तुविशारद आणि विधान परिषद सदस्यअनंत गाडगीळ उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून अजयकांत रुईया (ऑल स्टेट ग्रुपचे अध्यक्ष आणि इंडो व्हिएतनामी चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष) आणि महेंद्र कलांत्री (संचालक, अॅक्लेम सिस्टीम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड) उपस्थिती राहणार आहेत.
या प्रदर्शनात सहभागी चित्रकारांनी आपल्या वैविध्यपूर्ण आणि विविध माध्यमातील कलाकृती या प्रदर्शनात सादर केल्या आहेत. यामध्ये वास्तव वादी, अमुर्त शैलीतील चित्रे, निसर्ग चित्रे, एक्सप्रेशनिस्ट, फायबर, मिक्स मीडिया अशा विविध माध्यमातील आशयघन कलाकृतींचा समावेश होतो. चित्र आणि शिल्प अशा दोन्ही माध्यमातील कलाकृती प्रेक्षकांचा आनंद द्विगुणित करतील. दृश्यभानाविषयी प्रेक्षकांना सजग करतील.
कला ही जशी आनंददायक असते तशीच जीवन मूल्यांचे दर्शन घडवणारी असते. कलाकृती पाहताना केवळ रंग , आकार यांचा सुरेख मिलाफच नाही तर कलाकाराची जीवन दृष्टीही कलाकृतीतून पाहता येते. आणि या दोहोंचा संगम कलाकारांसाठी उपलब्ध करून देणे हाच या प्रदर्शनाचा उद्देश आहे.
हे प्रदर्शन प्रेक्षकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहील. विविध माध्यमातील आशयघन कलाकृतींचा आनंद घेण्यासाठी चुकवू नये असेच हे प्रदर्शन आहे.