आनंद प्रभूदेसाई यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु
सुप्रसिद्ध रंगलेखक आणि शिल्पकार आनंद प्रभूदेसाई यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या कलाकृतींचं ‘सेन्सोरीयम‘ हे कलाप्रदर्शन जहांगीर कलादालनात १८ ऑक्टोबरपासून सुरु झाले असून, ते २४ ऑक्टोबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांसाठी खुलं राहील.

निसर्ग ‘गोष्ट’ निर्माण करताना तिला अनेक अंगाने अनुभवता येईल अशी बनवतो. माणसाने बनवलेली वस्तू मात्र माणसाच्या अनुभव घेण्याच्या सवयीनुसार बनते. तिचा अनुभव घेण्यासाठी माणूस नैसर्गिक इंद्रिय संवेदनांचा संकेत क्रम बदलवून टाकतो. दृश्यस्पर्श संवेदना इतर संवेदनाकडे घेऊन जातात. कारण सर्वसाधारणपणे या दोन संवेदना माणसाच्या वावराशी संबंधित मुख्य संवेदना झाल्या आहेत.
वस्तूचा अर्थ, त्याबद्दलच्या कल्पना, वस्तूची अनेक रूपं, आकार हे सर्व काही या वस्तुंना ग्रहण करण्यामधील अनेक संवेदनांची एकमेकांशी नाळ जुळल्यामुळे जो संवेदना पुंज तयार होतो. त्यामधून हे सर्व शक्य होते. या संवेदना पुंजांमुळे वस्तूला एक वेगळी ओळख प्राप्त होते. वस्तू म्हणजे ‘संवेदना पुंज ‘ !
आनंद प्रभुदेसाई यांची शिल्पसदृश्य कलाकृती या संवेदना पुंज, तो तयार होण्याची प्रक्रिया, त्याचे स्तर याकडे कुतूहलाने पाहते. काल्पनिक विश्वाच्या इंद्रधनुष्याप्रमाणे छटा या कलाकृती दर्शवतात. कलाकृती अनेक अवधनातून वस्तूसंबंधी एक अनुभव सादर करतात आणि या अनुभवाच्या केंद्रस्थानी आपल्याला वस्तू गवसते. आनंद स्पर्श आणि दृश्य याना विलग करून आपल्याला सुरवातीला दोन वेगळ्या मार्गावर घेऊन जातो, पुढे हे दोन मार्ग एक होऊन आपल्याला सौंदर्यपूर्ण वस्तू अनुभव देते. वस्तू अदृश्य आहे पण आपल्या कल्पनेमध्ये, तिच्या हाताळण्याच्या पूर्व अनुभवात – स्पर्श, गोंजारणे, उचलणे, बोटांनी, तळव्यांनी स्पर्श करणे, तिची त्वचा, वजन, आकारमान, आणि असंख्यरसपूर्ण आणि धुंद प्रतिमा मनात उमटतात. त्यांचे तरंग संगीत निर्माण करत राहतात.