शरद जाधव साकारतोय नामा!
एकांकिका चळवळीतून आंतरराष्ट्रीय जाहिरातीत चमकलेला शरद जाधव या कलावंताचे मुख्य भूमिका साकारण्याचे स्वप्न ‘घुमा’ या चित्रपटात साकार ओट आहे. हा चित्रपट २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.

मूळचा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा- ख़डले परमानंदचा शरद जाधव, अभिनयाच्या वेडापायी शिक्षण अर्धवट सोडून पुण्यात दाखल झाला. पुण्यात टेक्सास गायकवाड यांच्या प्रबुद्ध रंगभूमी संस्थेतून एकांकिका-नाटकातून कामं करू लागला. बऱ्याच प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकातून त्याने छोटी-मोठी कामं केली. फोक्सवॅगन, फेसबुकसारख्या आंतरराष्ट्रीय जाहिरातीही केल्या परंतु स्वत:चं पोट भरण्याचीही भ्रांत झालेल्या शरद जाधवला घरातून विरोध होऊ लागला. त्यामुळे घरच्या मंडळींनी त्याचं लग्न लावून देवू मग सुधरेल, या भाबड्या आशेपायी मुली पाहायला सुरूवात केली. आता आपल्याला कुठेतरी नोकरी करावी लागणार आणि आपलं ध्येय संपणार! यामुळे चिंताग्रस्त झालेल्या शरदने घरच्यांना लग्न करेन पण अभिनेता म्हणून नावारूपास येऊनच करेन, असं ठणकावून सांगितलं. तिथंपासून आजपर्यंत शरद अविवाहीत आहे. पण, आता घुमा या २९ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या बहुचर्चित सिनेमात त्याला हिरो म्हणून भूमिका मिळाली आहे.
आपल्या हुशार मुलाला जिल्हा परिषदेच्या शाळेतून काढून इंग्रजी शाळेत शिकवण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या एका शेतकरी बापाची…’नामा’ची प्रमुख भूमिका शरद जाधव साकारतोय. या चित्रपटाची गोष्ट ही ‘नामा’ या व्यक्तिरेखेभोवती फिरते त्यामुळे शरद जाधव या चित्रपटाचा खरा हिरो आहे.