पहिल्यांदाच साकारली शॉर्टफिल्ममध्ये भूमिका
आमिर खानच्या ‘तारे जमीं पर’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे थेट हिंदीतून आपली अभिनय कारकीर्द सुरू केल्यानंतर अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान निर्माण करणारी तसेच विविध प्रकारच्या जाहिराती आणि नाटकांद्वारे स्वतःतील अभिनेत्रीचं दर्शन घडवणाऱ्या गिरीजा ओक-गोडबोलेने प्रथमच ‘क्वॉर्टर’ या लघुपटात अभिनय केला आहे.

नेविअन्स स्टुडिओ प्रा. लि. या बेनरखाली नम्रता बांदिवडेकर यांनी ‘क्वॉर्टर’ची निर्मिती केली आहे. नवज्योत बांदिवडेकर यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कथा आणि संवादलेखन आलाप भागवत यांचं आहे.
प्रथमच लघुपटात अभिनय करण्याबाबत गिरीजा म्हणाली की, कमी वेळात खूप काही सांगण्याची ताकद लघुपटांमध्ये असते, त्यामुळे लघुपट पाहायला खूप आवडतं. आपल्यालाही एखाद्या लघुपटात काम करण्याची संधी मिळावी असं कायम वाटत होतं. ‘क्वॉर्टर’द्वारे माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. क्वॉर्टर मधील भूमिकाही खूप वेगळी आणि अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचंही गिरीजा म्हणाली.
गिरीजासारखी अभिनेत्री लाभणं ‘क्वॉर्टर’चं सर्वात मोठं वेगळेपण आणि यश असल्याचं मत दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केलं. ‘क्वॉर्टर’मध्ये गिरीजाने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी आम्हाला एक सशक्त अभिनेत्रीची गरज होती. कथा आणि आपल्या व्यक्तिरेखेबाबत ऐकल्यानंतर गिरीजाने लगेचच यात काम करण्यासाठी होकार दिल्याचं नवज्योत यांचं म्हणणं आहे. संदिप काळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. यश खन्ना यांनी छायांकनाचं काम पाहिलं असून संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले-सहाय यांनी केलं आहे. संगीत व्हिव्हियन रिचर्डस् यांनी दिलं असून अनमोल भावे यांनी ध्वनी आरेखन केलं आहे.