१६ एप्रिलला शास्त्रीय संगीताची मैफिल
‘उदयस्वर’च्या १८व्या कार्यक्रमात शुभा मुद्गल आपलं गायन रसिक प्रेक्षकांसमोर सादर करतील, त्यांना तबल्यावर साथ संगत करणार आहेत अनिश प्रधान व संवादिनी संगत करणार आहेत सुधीर नायक. हा कार्यक्रम १६ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता पृथ्वी थिएटर्स, जुहु येथे आयोजित करण्यात आला आहे.
पंचम निषाद आणि पृथ्वी थिएटर्सचे कुणाल कपूर यांच्या सहयोगाने ‘उदयस्वर’ हा प्रातःकालीन रागांच्या कार्यक्रम सादर केला जातो. सदर कार्यक्रम नोव्हेंबर २०१५ पासून दरमहा प्रस्तुत करण्यात येत आहे. पृथ्वी थिएटर्सचेएक असे वैशिष्ट्य आहे कि येथे कुठचीही कृत्रिम अथवा तांत्रिक ध्वनीव्यवस्था नाही आणि आसन क्षमता फक्त २०० असल्यामुळे येथील कार्यक्रमाला पारंपारिक बैठकीचे स्वरूप येते.
‘उदयस्वर’ची सुरवात नोव्हेंबर २०१५ साली झाली असून आतापर्यंत येथे देवकी पंडित, बुधादित्य मुखर्जी, प्रसाद खापर्डे, संगीता शंकर, मंजुषापाटील, बहाउद्दिन डागर, रघुनंदन पणशीकर, रूपक कुलकर्णी, शुचिस्मिता दास, मिलिंद व यज्ञेश रायकर, जयतीर्थ मेवुंडी, तेजश्री आमोणकर, सतीश व्यास, उल्हास कशाळकर, शाकीर खान, राहुल देशपांडे आणि राकेश चौरासिया यांनी आपली कला रसिक श्रोत्यांसमोर प्रस्तुत केली.
हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या प्रख्यात गायिका शुभा मुद्गल यांचा जन्म १९५९ सालचा. त्यांचे सांगितिक प्रशिक्षण विख्यात गायक पंडित रामाश्रय झा यांच्याकडे झाले व पुढील प्रशिक्षण त्यांनी गुरु-पंडित विनय चंद्र मौद्गल्य, पंडित वसंत ठक्कर, पंडित कुमार गंधर्व व पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक समृद्ध केले. त्यांनी भारतात आणि विदेशात अनेक मैफिली सादर केल्या आहेत. २००२ साली भारत सरकारने त्यांना पद्मश्रीने सन्मानित केले.
या कार्यक्रमाचे तिकीट मूल्य ३०० रुपये असून, पृथ्वी थिएटर्स आणि www.bookmyshow.com येथे उपलब्ध आहेत.