प्राचीन शिल्पांचे जतन होणे आवश्यक – गिरीश बापट
भारतात पुरातत्व शिल्पे मोठ्या प्रमाणावर आहेत, या शिल्पांच्या जतनाकडे ब्रिटीश काळात दुर्लक्ष झालेले आहे, स्वातंत्र्यानंतरही त्यात फार सुधारणा झालेली नाही, अनेक ठिकाणची शिल्पे आजही दुर्लक्षित आहेत, नव्या पिढीला भारतीय कला, संस्कृती समजण्यासाठी या पुरातन शिल्पाचे जतन करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी केले.

पालकमंत्री बापट म्हणाले, पुरातन मंदिरांना डागडुजी करताना पेंट दिला जात आहे ते थांबायला हवे. शासनाने या बाबींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, याचे चांगले परिणाम भविष्यात दिसतील.
चित्र पाहताना अनेकदा यात काय आहे हे कळत नाही मात्र वनिता जाधव यांच्या चित्रामधून आपण प्रत्यक्ष शिल्प बघत असल्याचा भास होतो हे त्यांचे यश आहे. वाईच्या दगडामध्ये लपलेल्या इतिहासाला या चित्रांच्या निमित्ताने उजाळा मिळाला आहे तसेच या प्रदर्शनातून शिल्पकलेकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळाल्याचेही बापट यांनी नमूद केले.
वनिता जाधव आपल्या प्रास्ताविकपर भाषणात म्हणाल्या की, १९९३ साली या ठिकाणी माझ्या चित्रांचे प्रदर्शन भरविले होते आज पुन्हा तो योग आल्याचा आनंद झाला आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून वाईचा सांस्कृतिक, ऐतिहासिक पर्यटनस्थळात समावेश करण्याचा माझा प्रयत्न आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजिरी धामणकर यांनी केले.