चित्रपट पाहाण्यासाठी मुख्यमंत्री उत्सुक
श्रीलंका, चीन, जपान, थायलँड, उत्तर कोरीया, व्हिएतनाम आणि इतर बौद्धराष्ट्रात तुफान गाजलेला आणि युनायटेड नेशनने गौरवलेल्या ‘सिरी सिद्धार्थ गौतम’ हा चित्रपट येत्या १४ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहांत दाखल होत आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात ‘टॅक्स फ्री’ असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“धम्मचक्र प्रवर्तनदिन आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाचे औचित्य साधून हा चित्रपट १४ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय, याचा मला मनापासून आनंद आहे. तथागत भगवान गौतम बुद्धांचे विश्वमान्य विचार, त्यांनी सत्याच्या शोधासाठी केलेला त्याग सिनेमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेने पाहावा, असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले.

बॉलीवूड आणि हिंदी टीव्ही क्षेत्रातील आघाडीच्या कलाकारांनी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. रामायण तसेच संकटमोचन महाबली हनुमान या मालिकेत श्रीरामाच्या भूमिकेमुळे लोकप्रिय झालेला अभिनेता गगन मलिक याने युवराज सिद्धार्थ गौतमाची भूमिका वठवली आहे. त्याच बरोबर बीग बॉस – सीझन ८चा विजेता गौतम गुलाटी याने देवदत्त तसेच अभिनेत्री आँचल सिंह हिने यशोधरा तर अंशू मलिक या अभिनेत्रीने महामाया साकारली आहे.
मूळ सिंहली भाषेतील हा चित्रपट असून, श्रीलंकेत देदीप्यमान यश संपादन करताना स्थानिक भाषेतील सर्व रेकॉर्ड मोडले. त्यानंतर अनेक बौद्धराष्ट्रात प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. युनायटेड नेशनच्या जागतिक बुद्धीस्ट फिल्म फेस्टीवलमध्ये पाच इतर पुरस्कारांसह सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला. २०१३ या वर्षीच्या दिल्ली इंटरनॅशनल फिल्म फेस्टीवलमध्ये तीन पुरस्कांनी गौरविण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सिने रसिकांना तसेच तमाम बुद्धीस्ट जनतेला पाहता यावा म्हणून नितीन गजभिये व गगन मलिक यांची कल्याण मित्ता एंटरप्रायझेस ही संस्था १४ ऑक्टोबर रोजी हिंदी भाषेत महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित करीत आहे.