दिवाळी स्पेशल एपिसोडचे चित्रीकरण पूर्ण
स्टार प्रवाहावरील पुरुषोत्तम बेर्डे यांच्या ‘ग सहाजणी’ या दिवाळी स्पेशल एपिसोडचे नुकतेच चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. हा एपिसोड दिवाळी गाजवणारा असल्यामुळे चित्रीकरणासाठी बॅंकेची सुंदर सजावट करण्यात आली होती. एवढेच नव्हे तर काही दिवसावर येऊन ठेपलेल्या दिवाळसणानिमित्ताने मालिकेतील ‘मंजुळाबाई उसने परतफेड बॅंकेतील सर्व कर्मचाऱ्यांना आगळावेगळा महाबोनस मिळाला आहे.


बॅंकेच्या गेटटुगेदर पार्टीत रंगलेल्या महिलांच्या विविध स्पर्धेत या सहाजणींनी पुरेपूर बक्षिसाची लयलूट केली. सोबतच बॅंकेचे खडूस मॅनेजर धबडगावकर वर्सेस ‘गं सहाजणी’ अशी चुरशीची स्पर्धादेखील यात रंगली.

एका बँकेत काम करणाऱ्या सहाजणींची गोष्ट सांगणारी ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास यशस्वी झाली आहे. या मालिकेतील शर्वणी पिल्लई (मीना मोडक), नियती राजवाडे (दामिनी), नम्रता आवटे (जुबेदा), पोर्णिमा अहिरे (भीमा), सुरभी भावे (सुश्मिता) आणि मौसमी तोडवळकर (कामिनी) या प्रमुख अभिनेत्रींनीं आपापल्या भूमिकेतून ‘गं सहाजणी’त रंग भरला आहे.
दिवाळी सणानिमित्त महिलावर्गात होणारी चर्चा, नट्टापट्टा, शॉपिंग तसेच रांगोळी… ! असे बरेच काही या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे. तसेच नेहमीच दराऱ्याखाली आणि आपल्या मर्जीत ठेवणाऱ्या धबडगावकरांची या सहाजणी दिवाळी स्पेशल भागात कशी फजिती करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.