वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २८ मे रोजी
विनोदी चित्रपटांची परंपरा पुढे चालवत नव्या पिढीची भाषा बोलणारा, नव्या पिढीचे बोल्ड विचार मांडणारा आणि ब्लॅक कॉमेडीचा खमंग तडका असलेला ‘घंटा’ हा चित्रपट’ स्टार प्रवाह’वर पाहता येणार आहे.
या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २८ मे रोजी दुपारी १ आणि सायं. ७ वाजता पाहता येणार आहे. अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर या नव्या पिढीच्या अभिनेत्यांनी या चित्रपटात धमाल केली आहे.
‘घंटा’ या सिनेमात तीन अतरंगी मित्र राज, उमेश आणि अंगद यांची कथा आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे हे तीन मित्र एकत्र मुंबईत राहतात. आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी ते धडपडत आहेत; पण त्यांना हवं तसं काम मिळत नसल्याने पैशांची अडचण आहे. त्यामुळे वेगळ्या पद्धतीनं ते पैसे मिळवण्याच्या मागे लागतात आणि गोत्यात येतात. त्यातून सुटका करून घेताना त्यांची जी काही अवस्था होते, त्याचं धमाल चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.
शैलेश काळे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात अमेय वाघ, सक्षम कुलकर्णी, आरोह वेलणकर, अनुजा साठे यांच्यासह पुष्कर श्रोत्री, किशोर कदम असे अनुभवी कलाकारही आहेत. त्यामुळे उत्तम अभिनयाची मेजवानी या चित्रपटात आहे. वेगळ्या पद्धतीची मांडणी, दमदार गाणी आणि उत्तम ग्राफिक्स हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. नव्या धाटणीचा चित्रपट म्हणून त्याचं कौतुक झालं होतं. नव्या पिढीची धमाल आणि ब्लॅक कॉमेडीचा तडका असलेला हा चित्रपट २८ मे रोजी दुपारी १ आणि सायं ७ वाजता नक्की पहा फक्त स्टार प्रवाहवर.