‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने होणार प्रारंभ
‘सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि ‘झोपी गेलेला जागा झाला’ या पाच नाटकांचा ‘हर्बेरियम’ उपक्रम २०१२ मध्ये संपल्यानंतर अभिनेते सुनील बर्वे नवीन काय घेऊन येणार याकडे नाट्यरसिकांचे ही डोळे लागले होते. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही उत्सुकता संपणार असून ‘हर्बेरियम’च्या दुसऱ्या नव्या पर्वाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.


‘हर्बेरियम’ या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला लाभलेल्या उत्तम यशानंतर दुसऱ्या पर्वाचे स्वागत ही नाट्यरसिक जोरदार करतील आणि हे पर्वही नाट्यरसिकांना स्मरणरंजनाचा आनंद देईल असा विश्वास सुनील बर्वे यांनी व्यक्त केला. ‘हर्बेरियम’ चा उपक्रम राबवताना तो अभ्यासपूर्वक राबवायला हवा यासाठी सुनील बर्वे आग्रही होते. त्यासाठी परदेशी जाऊन जागतिक रंगभूमीचा आढावा घेतल्यानंतर आपला दृष्टीकोन बदलला असं सांगत ‘हर्बेरियम’च्या उपक्रमात याचा फायदा झाल्याचं सुनील बर्वे आवर्जून सांगतात. चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, केदार शिंदे व कलाकार मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी, धनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.

‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकात मृण्मयी गोडबोले, ईशा केसकर, ललित प्रभाकर, अभिजीत खांडकेकर, निखील रत्नपारखी या कलावंतांसह धनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव हे दोन नव्या दमाचे गायक कलावंत भूमिका करणार आहेत. याचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची असणार आहे. संगीत राहुल रानडे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. शनिवार २३ सप्टेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दुपारी ४ वाजता रंगणार आहे.