सुनील देवरे यांच्या शिल्प कलाकृतींचे प्रदर्शन
सुप्रसिध्द शिल्पकार सुनील देवरे यांच्या शिल्पांचे प्रदर्शन १७ ते २० नोव्हेंबर २०२३ या कालावधीत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी, मुंबई येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन दि १७ नोव्हेंबर रोजी खासदार सुप्रिया सुळे, यांच्या हस्ते झाले. सुप्रिया ताई यांनी प्रदर्शनातील कलाकृतींचे कौतुक केले. प्रस्तुत प्रदर्शन देवरे यांच्या कलात्मकतेच्या उत्क्रांतीचे साक्षीदार होण्याची आणि त्यांच्या कार्याची व्याख्या करणाऱ्या सांस्कृतिक समृद्धीचा अनुभव घेण्याची अनोखी संधी देते.
सुनील देवरे यांनी सर जेजे स्कूल ऑफ आर्टमध्ये विद्यार्थी म्हणून आपल्या कलात्मक प्रवासाला सुरुवात केली. त्यांनी १९८९ मध्ये कला अभ्यास सुरू केला. १९९५ मध्ये औरंगाबाद येथील स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण पूर्ण केले. पुढे प्रतिष्ठित जेजे स्कूल ऑफ आर्ट येथे त्यांनी शिल्पकलेचे शिक्षण पूर्ण केले. औरंगाबादसारख्या छोट्या शहारातुन देवरे यांनी आपला कला प्रवास सुरु केला आणि आज ते जागतिक पातळीवरचे महत्वाचे शिल्पकार म्हणून पुढे आले आहेत. त्यांचा हा कला प्रवास कोणत्याही कलाकाराला प्रेरणा देणारा आहे.
सुनील देवरे यांनी प्रतिष्ठित इंदिरा गांधी सद्भावना पुरस्कार, अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून व्यापक प्रशंसा मिळवली आहे. लंडन, दुबई, अबू धाबी आणि युनायटेड स्टेट्ससह जगभरात त्यांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत.
देवरे यांनी नव्याने बांधलेल्या संसद भवनासाठी राष्ट्रीय प्रतिकाचे शिल्प तयार केले आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांच्या प्रतिभेची जागतिक ओळख आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कामाचा प्रभाव अधोरेखित होतो.
सुनील देवरे यांच्या शिल्पांचे वैशिष्टय म्हणजे परंपरा आणि समकालीन अभिव्यक्ती यांची सुंदर गुंफण ते आपल्या कालाकृतीमध्ये करतात. त्याचबरोबर मिथक कथेतील प्रतीके आणि मानवी आकार यांच्यावर एकत्रितपणे प्रयोग करून ते एका नव्या आकाराची निर्मिती आपल्या शिल्पात तयार करतात. आकारांबरोबर केलेल्या प्रयोगांमुळे त्यांची शिल्पे एकाच वेळी वास्तववादी आणि अमूर्त भासतात. कला रसिकांना वेगवेगळया शक्यतांची झलक दर्शवतात. त्यामुळे देवरे यांची शिल्पे म्हणजे नाट्यमयतेचे अद्भुत दर्शनच असते.
गेली ३५ वर्षे देवरे हे शिल्प साधना करत आहेत. त्यामुळे त्यांची तपश्चर्या त्यांच्या कालाकृतीमधून सहज दिसून येते. कला साधनेच्या पायावर त्यांची कला उभी आहे त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कलाकृतीला वास्तववादी शैलीची किनार आहे. शिल्प तयार करण्यासाठी वापरलेल्या माध्यमाचे वैविध्य, त्या माध्यमाला आपल्या कल्पनेनुसार वळवण्याची हातोटी ही अथक कला साधनेतूनच येऊ शकते. प्रस्तुत प्रदर्शनात शिल्पकृतींमध्ये ब्राँझ, मार्बल व इतर माध्यमांचा प्रभावी वापर केला आहे.
देवरे यांनी शिल्प या अवघड माध्यमांवर प्रभुत्व मिळवले आहे. त्यामुळे ते एकाच वेळी सूक्ष्म तपशील असलेले आणि कमीतकमी तपशील असणारी शिल्पे तेवढयाच प्रभावीपणे साकारतात. आणि या माध्यम प्रभुत्वामुळे आपण त्यांच्या प्रदर्शनात एकाच वेळी सूक्ष्म तपशिलाने जिवंत झालेले घोड्याचे शिल्प आणि अत्यंत कमी पण लयदार आकार असलेले हंसाचे शिल्प बघू शकतो. ही दोन्ही शिल्पे शिल्पकार म्हणू देवरे यांच्या कला साधनेची साक्ष देतात.
देवरे यांची शिल्पे केवळ प्रमाणबद्धता आणि कलाकृतीची नाट्यमयता यांचा उत्सव नसून ते एक जिवंत काव्य आहे. त्यांच्या कलाकृती जीवनातील तत्वज्ञान तरलपणे मांडतात. त्यामुळे त्यांचे प्रत्येक शिल्प काळाच्या पुढे जाणारे आहे. मानव आणि निसर्गाच्या आधुनिक काळातील अस्तित्वाशी प्रगल्भ नाते सांगणारे आहे.
क्लिष्टपणे कोरलेल्या पौराणिक आकृत्यांपासून ते लोककथांनी प्रेरित समकालीन शोधांपर्यंत, सुनील देवरे यांचे नवीनतम प्रदर्शन हे परंपरा आणि नवकल्पना यांच्यातील अंतर कमी करण्याच्या त्यांच्या क्षमतेचा पुरावा आहे.
त्यामुळे समकालीन शिल्पकलेतील प्रवाहांना जाणून घेण्यासाठी कला रसिकांनी आवर्जून या प्रदर्शनाला भेट द्यावी. प्रस्तुत प्रदर्शन हे कला रसिकांसाठी सकाळी ११ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत खुले राहील.