सुनील जाधव यांच्या चित्रांचे
३० ऑक्टोबरपासून प्रदर्शन
प्रसिद्ध चित्रकार सुनील जाधव यांनी साकारलेल्या ‘अंतरयात्रा’ या आध्यात्मिक चित्रांचे प्रदर्शन मुंबईत काळा घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीत ३० ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. ५ नोव्हेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत कलाप्रेमींना ते नि:शुल्क बघता येईल.
चित्रकार सुनील जाधव यांची यापूर्वी सुद्धा अनेक ठिकाणी देश विदेशात चित्र प्रदर्शने भरली आहेत. त्यांच्या चित्रांचा संग्रह अनेक मान्यवर व्यक्तींच्या जवळ आहेत. त्यांचे कलाप्रेमी देशात आणि विदेशातही आहेत. सुनिल जाधव यांचे शिक्षण एम. एफ. ए पर्यंत झाले असून त्यांना स्कॉलरशिप आणि अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी अनेक चित्रपट, मालिका व अल्बममध्ये सहाय्यक कला दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.
चित्रकार सुनील जाधव यांनी आसपासच्या वास्तवाचे प्रांजळ निरीक्षण करून रंग, रेषा, आकार, अवकाश यांच्या समन्वयातून एक दृक सुगंध देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. परमेश्वर आणि त्याची व्याप्ती कुणी ठरवावी? चित्रकार जाधव यांना जाणवणारा अमर्यादपणा त्यांच्या चित्रातून व्यक्त होतो. त्यासाठी उदाहरण म्हणून श्री गणपती, कृष्ण, गौतमबुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज या देवतांच्या आसमंतात असलेल्या समावेशाचे चित्रण यांच्या कुंचल्यातून कॅनवासवर उतरले आहे.
गेली काही वर्षे चित्रकलेची नियमित तपस्या करणारे जाधव आपल्या चित्रांमध्ये रसिकाला अंतर्मुख होताना देहभानाच्या जडत्वातून अमर्याद अवकाश भ्रमण करवतात. त्यांच्या चित्रकामातील आकर्षकता गुणधर्म कला रसिकांना मंत्रमुग्ध करून ठेवतात. सुनील जाधव यांची काही चित्रे ओशो (रजनीश) यांच्या तत्वज्ञांनावर आधारीत आहेत. त्यांचा हा आध्यात्मिक कलाविष्कार दि. ३० ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर, २०२३ दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत रसिकांना विनामूल्य पाहता येईल.