सुनील परदेशी यांच्या कलाकृतींचे १५ ऑगस्टपासून प्रदर्शन
चित्रकार सुनिल परदेशी यांनी तैलरंगात कॅनव्हासवर साकार केलेली ग्रामीण जीवनाची झलक दाखवणारी चित्रं या प्रदर्शनात मांडली आहेत. मूर्तचित्रकारितेत कुंचल्याची जादू साकारताना रंगांचासूयोग्य वापर करून जीवनाचं प्रतिबिंब या चित्रांमधून पाहावयास मिळणार आहे.
कर्जतस्थित सुप्रसिद्ध रंगलेखक सुनील परदेशी यांनी अलीकडच्या काळात केलेल्या कलाकृतींचे चित्रप्रदर्शन १५ ऑगस्ट ते २१ ऑगस्ट या दरम्यान सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, डॉ. ॲनी बेझंट रोड,वरळी, मुंबई येथे हे प्रदर्शन सुरु राहणार आहे.

सुनील परदेशी यांनी मुंबईच्या एल.एस. रहेजा स्कूल ऑफ आर्टमधून आपले शिक्षण पूर्ण केले आणि अनेक एकल कलाप्रदर्शनांमधून आपली कलारसिकांसमोर सादर केली. निसर्गातील सौंदर्य प्रकट करताना त्यात दडलेले कलात्मक पैलू उलगडून दाखवण्याची ताकद या चित्रांमध्ये आहे. बैलजोडीला स्नान घालणारा शेतकरी, निवांतपणे काही क्षण जगणाऱ्या लमाणी स्त्रिया, किनाऱ्यावर विसावू पाहाणाऱ्या नावा, आपल्या दिवसाला सुरुवात करणारी डोंबारीण, वस्तीतली आळी असे अनेक प्रसंग या प्रदर्शनात चित्रांमधून मांडले आहेत.
कला ही अथांग सागरासारखी असून, कलारसिकांना त्यात किमान काही डुबक्या मारता याव्यात आणि प्रतिबिंब, छाया-प्रकाश, देखावे यांचा आनंदरसिकांनी घ्यावा असा कलाकाराचा मानस हे प्रदर्शन भरवण्यामागे आहे.