साईशा फाउंडेशनची निर्मिती
साईशा फाउंडेशन मुंबई निर्मित व प्रस्तुत ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ या छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित ४२ नवगीतांच्या धगधगत्या संगीतमय शिवचरित्राचा २५वा प्रयोग आणि ५ वर्षांचा वर्षपूर्ती सोहळा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर दिनांक ११ ऑक्टोबर २०१६ रोजी रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत संपन्न होत आहे.

हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून याच्या प्रवेशिका रवींद्र नाट्यमंदिर येथे दिनांक ८ ऑक्टोंबर २०१६ पासून उपलब्ध होतील. ‘शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव’ हा कार्यक्रम भारतीय सैन्याला समर्पित करण्यात येणार असून, मुख्यतः उरी हल्यात शहीद झालेल्या जवानांना या कार्यक्रमाद्वारे श्रदांजली अर्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी जी देणगी जमा होईल ती ‘सैनिक कल्याण केंद्र’ या भारतीय सैन्य आणि त्यांच्या कुटुंबासाठी काम करणाऱ्या संस्थेला देणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

गीतांचा प्रसंगानुरूप सादरीकरण, ऑडिओ – व्हिज्युअल तंत्राचा वापर आणि गीतांमधील प्रसंग नृत्य – नाट्य तसेच लढाईच्या प्रसंगांद्वारे खुलवण हे शिवरुद्राचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

‘मराठी, इंग्रजी, हिंदी अशा चौफेर निवेदनातून छत्रपती शिवरायांचा इतिहास मांडतांना, इतिहास-वर्तमान आणि भविष्य याची योग्य ती सांगड घालीत या शिवचरित्राचे सादरीकरण करताना आम्हाला सदैव अभिमान वाटतो’ असे कार्यक्रमाच्या सूत्र संचालिका आणि दिग्दर्शिका कुमारी पद्मश्री राव सांगतात.
सदर उपक्रमाचे पाचवे वर्ष साजरे करताना आजपर्यंत याचे २४ कार्यक्रम महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये यशस्वीपणे साकार झाले. हा कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तीन भाषांमध्ये सादर केला जातो. “शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव” या कार्यक्रमातील गीतांना महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या ओजस्वी वाणीतून निवेदन लाभले असून, थोर इतिहासकार निनादराव बेडेकर, तुकाराम जाधव, बाळ बेंडखळे, ऐतिहासिक शस्त्र संग्राहक गिरीश जाधव अशा अनेक मान्यवरांनी आपल्या बहुमोल मार्गदर्शनाने या कार्यक्रमास सर्वार्थाने सुंदर बनवण्यास सर्वतोपरी सहकार्य केले.
साईशा फाऊंडेशन मुंबई या रजिस्टर्ड संस्थेअंतर्गत सदर उपक्रम सादर केला जातो. सामाजिक हेतू आणि भक्कम राष्ट्रभक्तीतच्या कार्यात आपला खारीचा वाटा उचलताना साईशा फाऊंडेशन यांनी स्वतःला झोकून दिले आहे. या उपक्रमातून उभा राहिलेला निधी हा सामाजिक संस्थांसाठी, गरजू विद्यार्थ्यांसाठी, मराठी शाळांसाठी, आपत्कालीन पुनर्वासियांसाठी उपयोगात आणला जातो.
कार्यक्रम : शिवरुद्राचे दिग्विजयी तांडव
गायक : अनिल नलावडे, दत्तात्रय मेस्त्री, केतन पटवर्धन, हृषीकेश पाटील, अभिषेक पाळंदे, नाजूक वीरकर
नृत्य : गणेश केरकर व सहकारी
शस्त्र नैपुण्य : ओंकार कंग्राळकर, प्रणय शेलार व सहकारी
दिनांक व वेळ : ११ ऑक्टोंबर २०१६ दुपारी २ वाजता
स्थळ : रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई