मुंबईत ८ डिसेंबरला रंगणार मैफल
या महिन्याच्या `सूरसागर – दर महिन्याला उगवता तारा` या सांगीतिक मालिकेत गोवास्थित सुमेधा देसाई या गुणी व वैविध्यपूर्ण गायिकेच्या स्वरांनी रसिकांची मने तृप्त होणार आहेत. ८ डिसेंबर, शुक्रवार रोजी संध्याकाळी ७.३० वाजल्यापासून मुंबईतील सायनस्थित श्री षण्मुखानंद पद्मा रंगा चेंबर म्युझिक हॉल येथे रंगणाऱ्या या मैफलीत सुमेधाताईंना तबल्यावर साथ करणार आहेत, वैभव खंडोळकर आणि सिद्धेश बिचोळकर संवादिनीचे सूर छेडणार आहेत.
प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर मैफलीत मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.
गोवा येथील सुमेधा देसाई यांनी भारतीय शास्त्रीय संगीत गायनाचे प्रशिक्षण आग्रा व जयपूर घराण्यातून घेतले आहे. प्रसिद्ध गुरू पं. सुधाकर करंदीकर आणि पं. बबनराव हळदणकर यांच्याकडून अभिजात संगीताचे संस्कार लाभलेल्या सुमेधा देसाई यांना इतर कुणी नाही, तर दस्तुरखुद्द पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या पट्टशिष्य़ा होण्याचेही भाग्य लाभले आहे. सध्या श्रीमती माणिक भिडे यांच्याकडे सांगीतिक शिक्षण घेत असलेल्या सुमेधा या शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीत लीलया गाणाऱ्या काही आधुनिक गायिकांपैकी एक यशस्वी गायिका आहेत.
शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतासाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. यात मुंबईच्या नाट्यपरिषदेतर्फे `छोटा गंधर्व पुरस्कार`, दिल्ली व सांगली येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेतील `सर्वोत्कृष्ट गायिका स्पर्धा पुरस्कार` तसेच, २०१० साली गोवा सरकारच्या कला व संस्कृती विभागातर्फे `युवा सृजन पुरस्कार` आदी पुरस्कारांचा समावेश आहे. त्यांनी आजवर अनेक प्रसिद्ध संगीत संमेलने व सांगीतिक मैफली गाजवल्या असून भारतातील अनेक मानाच्या कार्यक्रमांत आपली कला आविष्कृत केली आहे.
श्री षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेची स्थापना १९५२ मध्ये झाली. उत्सुक विद्यार्थ्यांना भारतीय फाईन आर्ट्सच्या क्षेत्रात सुयोग्य प्रशिक्षण देणे तसेच, भारतीय पारंपरिक परफॉर्मिंग आर्ट्सना प्रोत्साहन देऊन तरुणांना आपल्या कला सादर करण्यासाठी एक त्कृष्ट व्यासपीठ निर्माण करून देणे हा या संस्थेच्या स्थापनेमागचा उद्देश होता. ´सभेंतर्गत पाश्चात्य व हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व भरतनाट्यम नृत्यप्रकाराचे प्रशिक्षण देण्यासाठी संगीत विद्यालयाची स्थापनाही करण्यात आली आहे.´ याव्यतिरिक्त, समाजातल्या वंचित गटांसाठी किफायतशीर हेल्थकेअर सेवा पुरवण्याचे कामही या सभेतर्फे सक्रीयपणे केले जाते. या माध्यमातून, विविध राष्ट्रीय उपक्रमांना ही संस्था हातभार लावत असते.
भारतीय तरुणांची परफॉर्मिंग आर्ट्सच्या क्षेत्रातली कौशल्ये आजमावण्यासाठी षण्मुखानंद फाईन आर्ट्स आणि संगीत सभेतर्फे `सूरसागर – दर महिन्याला एक उगवता तारा` ही मासिक मालिका सुरू करण्यात आली असून एप्रिल २०१७ ते २०१८ या कालावधीत ही मालिका सुरू राहणार आहे. या मासिक मालिकेमध्ये गायन आणि वादन अशा दोन्ही प्रकारचे परफॉर्मन्सेस सादर केले जाणार आहेत. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर या कार्यक्रमाचा प्रवेश विनामूल्य आहे. आपली नाव नोंदणी sursagar.sabha@gmail.com या ई-मेल आयडीवर करू शकता.