१० डिसेंबरला शास्त्रीय संगीताची स्वरयात्रा
`बडिंग स्टार्स` या स्वरयात्रा आणि भगवानदास पेराज फाऊण्डेशन प्रस्तूत मैफलीत भारतीय शास्त्रीय संगितातल्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जात असून, या वेळी ही मैफल गाजवणार आहे तबलजी इशान घोष आणि गायक भाग्येश मराठे.. या तरुण संगीतकारांची मैफल १० डिसेंबर २०१७ च्या रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून, दुसरा मजला, सहयोग मंदीर, घंटाळी, ठाणे (पश्चिम) येथे रंगणार असून कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य आहे. ही मैफल सर्वांसाठी खुली आहे.

लहानपणीच संगीत संस्कार मनावर बिंबलेल्या इशान यांची स्वर व तालविषयक समज त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असून २००० साली जन्मलेल्या तरुण इशानने नैसर्गिकरित्याच तबल्यावरील तालांची समज आत्मसात केली. त्याने वयाच्या दोन-अडीचाव्या वर्षी आपली पहिली एकेरी तबला मैफल गाजवली. घराण्याच्या पूर्वीच्या पिढ्यांकडून तबलावादन जन्मजातच शिकलेला इशान हा तबलागुरू पद्मभूषण पंडीत निखील घोष यांचा नातू असून प्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांचाही तो भाचे नातू आहे. इशानचे वडील पंडीत नयन घोष यांच्याकडून त्याने तबल्याची रीतसर तालीम घेतली असून त्याच्या वडीलांना भारतातल्या अग्रेसर तबलजी व सीतारवादकांमध्ये स्थान दिले जाते.
दुसऱ्या सत्रात तबल्यावर ऋग्वेद देशपांडे आणि संवादिनीवर सिद्धेश बिचोलकर यांच्या साथीने भाग्येश मराठे याचे गायन होणार आहे. ज्येष्ठ गायक पं. राम मराठे यांचा नातू असलेल्या भाग्येश मराठे याने वयाच्या चौथ्या वर्षा तबला शिकण्यास सुरूवात केली आणि हे प्रशिक्षण पुढील पंधरा वर्षे सुरू ठेवले. प्रभू घाटे, भाग्येशचे काका. मुकुंद मराठे, पं. मुकुंदराज दे आणि गजानन राऊळ (उस्ताद अल्लारखा खान साहेब यांचे शिष्य) अशा विविध गुरूंकडून त्याचे संगीतधडे गिरवले. त्याने मुंबईच्या के. सी. महाविद्यालयातून माहिती तंत्रज्ञान विषयात पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या १९ व्या वर्षी वडिलांच्या सांगण्यावरून त्याने आपल्या आजोबांचे वादन ऐकण्यास सुरूवात केली आणि त्याचबरोबर अनेक भारतीय शास्त्रीय रागदाऱ्या व गायनही आत्मसात केले. आपले आजोबा व पं. कुमारजी यांच्या गायकीने तो आश्चर्यचकित झाला आणि त्याने गायन हा व्यवसाय म्हणून स्विकारण्याचा निर्णय घेतला. त्याचे वडील पं. संजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने संगीतधडे गिरवले आणि सध्या तो गुबळी येथील डॉ. गंगुबाई हनगल गुरूकूल येथे पं. केदार बोडस यांच्या मार्गदर्शनाखाली शिकतो आहे.
स्वरयात्राचे संस्थापक मनोज मांडलीकर म्हणाले, “पाच वर्षांपूर्वी तरुण संगीतकार, गायक आणि वादकांना आपली कला सादर करण्याची संधी देता यावी, यासाठी एक व्यापक व्यासपीठ म्हणून स्वरयात्राची स्थापना केली. वरील प्रत्येक कलाकाराकडे आपली कला व्यक्त करण्याची त्या-त्या परंपरेला धरून ठेवलेली स्वतःची अशी एक शैली आहे. परंपरा जपत असताना त्यातून नवीन काही निर्माण करण्याच्या आमच्या प्रयत्नांचे दिग्गज मंडळींनी कौतुक केले आहे.“