एसएमव्ही फिल्म्सचा सिनेमा १० मार्चला प्रदर्शित होणार
प्रेमकथेवर आधारित असलेला एसएमव्ही फिल्म्स निर्मित ‘तलाव’ हा सिनेमा येत्या १० मार्च रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. सिनेरसिक या तलावात चिंब भिजतील अशी आशा या टीम ‘तलाव’ला आहे.
नवनीत मनोहर फोंडके निर्मित आणि जयभीम कांबळे दिग्दर्शित ‘तलाव’ चित्रपटात अभिनेता सौरभ गोखले, संजय खापरे, प्रियांका राऊत, नवनीत मनोहर फोंडके, वर्षा पवार, ऐश्वर्या बडदे आणि हृषीकेश बांबूरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अभिनेत्री प्रियांका राऊत हिच्या निमित्ताने एक नवा चेहरा सिनेसृष्टीला मिळाला आहे.

गावातील होतकरू तरुण सिद्धू (सौरभ गोखले) आणि लेखिका म्हणून नाव कमवू पाहणारी कादंबरी (प्रियांका राऊत) या दोघांची ही प्रेमकहाणी या सिनेमाचा गाभा आहे. सिनेमाचं छायांकन प्रमोद श्रीवास्तव यांनी केलं आहे. गायक नंदेश उमप आणि आदर्श शिंदे यांच्या भारदस्त आवाजातील गाण्यामुळे तलाव या सिनेमाला एक वेगळीच लकाकी मिळाली आहे. आशिष आंबेकर यांनी चित्रपटाची गाणी संगीतबद्ध केली असून राहुल काळे यांनी गीतबद्ध केली आहेत. ‘मोरया रे बाप्पा मोरया रे’, ‘गोंधळ मांडला’, ‘तुझ्या सवे…’ ही तिन्ही वेगळ्या धाटणीची गाणी चित्रपटात आहेत. ‘तुझ्या सवे…’ हे प्रेमगीत प्रीती निमकर (जोशी) आणि मंगेश चव्हाण यांनी गायलं आहे. व्हिडियो पॅलेसच्या माध्यमातून या सिनेमाच्या गाण्यांचा आनंद प्रेक्षक घेत आहेत.

निसर्गासारखं रम्य, स्वच्छ आणि मोहक प्रेम एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातून निघून गेल्यावर राहते निव्वळ नीरसता. आयुष्यात आलेली तलावासारखी शांतता आणि स्तब्धता या सिनेमातून नेमकीपणाने दाखविली आहे.
तलावाच्या काठाशी फुलणाऱ्या सिद्धू आणि कादंबरी यांच्या प्रेमकहाणीच नशीब नेमकं कसं पालटून जातं ही गोष्ट या सिनेमात दाखविण्यात आली आहे. अतूट प्रेमाचे आणि दाहक आक्रमतेचे चित्रण या सिनेमात पहायला मिळणार आहे. सिबा पी आर अँड मार्केटींग यांनी सिनेमाची प्रसिद्धी सांभाळली आहे.