मुंबईच्या काळाघोडा परीसरातील ‘आर्टीस्ट सेंटर’ कलादालनात, २८ नोव्हेंबरपासून तपन मडकीकर यांचे ‘रिलॅक्सोग्राफ’ हे एकल प्रदर्शन म्हणजे मुद्राचित्र प्रदर्शन सुरु झाले असून ते ४ डीएसेम्बरपर्यंत सुरु राहणार आहे.

तपन मडकीकर यांचे ‘रिलॅक्सोग्राफ’
‘आर्टीस्ट सेंटर’मध्ये प्रदर्शन सुरु
एका चित्रकारासाठी शब्द आणि भाषेव्यतिरीक्त, कलेतून त्याचे विचार व्यक्त करण्यासाठी जी काही चित्ररूपी माध्यमं होती, त्यातील सर्वात प्राचीन पद्धत म्हणून प्रिंटमेकींग, अर्थात मुद्राचित्रांचा उल्लेख करावा लागेल. मनातील अनेक विचारांच्या कोलाहलातून बाहेर पडण्यासाठी कलाकाराला त्याची कला पूरक ठरते, ज्यातून तो मनातील विचार, चित्ररूपी कथेतून व्यक्त करत असतो. अशाच काही कथा आणि विचार, मुंबईतील मुद्रा-चित्रकार ‘तपन मडकीकर’ ह्यांच्या चित्रांमधून प्रकट झाले आहेत.
तपन यांच्या चित्रांतून, त्यांचे विचार आणि दृष्टीकोन अगदी स्पष्ट पणे व्यक्त होतो. चित्रकाराचे विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत स्पष्टपणे पोहोचतात. मुद्रा-चित्रण तंत्रात विचार मांडणी आणि चित्र रचनेसोबत तंत्रासही तेवढेच महत्त्व असल्यामुळे इथे चित्रकाराची जबाबदारी जास्त वाढते, हे विसरू नये. अगदी याच गोष्टीस प्राधान्य देऊन तपन यांनी मोनोटाईप, इन्ताग्लिओ आणि रिलीफतंत्रात त्यांची चित्रे सादर केली आहेत.
अतिशय प्रसन्नता आणि मनाला शांतता देणारा असा दुर्मिळ मिलाप तपन यांनी त्यांच्या प्रत्येक चित्रांमध्ये साधला आहे. रिलीफ तंत्रात चित्रित केलेल्या पोर्ट्रेट्समधून व्यतीत झालेले हावभाव, बघणाऱ्याच्या मनावर सखोल परिणाम करतात. लहान मुलगी आणि तिच्या खांद्यावर असलेल्या तान्ह्या मुलाच्या चेहऱ्यावरील मिश्कील हावभावांचा खेळ चित्रामध्ये टिपण्यात चित्रकार यशस्वी झालेला दिसून येतो. अत्यंत बारकाव्याने केलेल्या व्यक्ती चित्रांबरोबरच, अत्यंत सोप्या आणि सहज पद्धतीने भौमितिक आकारांना चित्रकाराने लघुस्वरुपात चित्रबद्ध करून योग्य परिणाम साधला आहे.
त्यांनी साकारलेल्या निसर्गावरील चित्रांमधून त्यांच्या विचार मांडण्याच्या प्रेरणेचा अखंडस्त्रोत दिसून येतो. विशेषतः ‘सकाळ-दुपार-संध्याकाळ-रात्र’ ह्या चार चित्रांच्या संग्रहामधून चार प्रहर प्रेरित करण्याचा परिणाम त्यांनी वेगवेगळ्या रंगांमधून आणि आकारांतून प्रभावीपणे मांडला आहे.
तपन यांच्या काही चित्रांमधून त्यांनी मानवी प्रतिमान काढता त्यांचे अस्तित्व आणि वावर दाखवण्याची अतिशय सुंदरशैली अवगत केलेली दिसते. त्यांचीही चित्रे पाहून दिग्गज चित्रकार ‘हेनरीमातीझ’ यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
एकूणच, तपन मडकीकर यांची चित्रे पाहताना मनाला अशी जाणीव होते की या चित्रकाराची मानसिकता अतिशय शांत आणि मनस्थिर आहे. मुळात, दृष्टीकोन आणि विचार अतिशय स्पष्ट असल्यामुळेच चित्रकार उच्च दर्जाची स्थैर्यता असलेली आणि मनाला शांतता देणारी मुद्रा-चित्रे निर्माण करण्यात यशस्वी झालेला आहे.
शांतताही नेहमीच मनाला स्थैर्यता देते आणि स्थिर मन नेहमीच स्पष्ट विचारांना चालना देते. ‘रिलॅक्सोग्राफ’ हे एकल मुद्रा-चित्रप्रदर्शन नेमकी हीच जाणीव प्रदर्शित करते आणि चित्रकाराच्या यशस्वी वाटचालीचा प्रवास दर्शवते.