गुलाबी आठवणी कवटाळायला लावणारा नवा चित्रपट
आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अनेक जण पहिल्या प्रेमाच्या गुलाबी आठवणीत रमतात, गमतात आणि त्या क्षणांच्या गोड आठवणींना कवटाळतातही. ‘ती सध्या काय करते’ या प्रश्नाद्वारे मनाच्या कप्प्यातला त्या खास आठवणींना उजाळाही देतात.

तरुणाईसह सर्वांनाच त्यांच्या आयुष्यातील आठवणी जाग्या करणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडीओजने केली असून. हा नवा कोरा मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षात अर्थात ६ जानेवारी २०१७ ला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ज्याचे नावच आहे ‘ती सध्या काय करते’.
सतीश राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटात मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अंकुश चौधरी आणि ‘होणार सून मी या घरची’मधून घराघरांत पोचलेली तेजश्री प्रधान ही जोडी प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र आली आहे.

याप्रसंगी बोलताना सतीश राजवाडे म्हणाले की, प्रत्येक जण किमान एकदा तरी प्रेमात पडतोच, आणि एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी दोघांची गरज असते असं माझं ठाम मत आहे. कधीतरी मित्रांसोबत बसलेलो असताना हा प्रश्न खरंच डोकावतो की ती सध्या काय करत असेल? आणि याच भावनेला घेऊन हा चित्रपट बनवला आहे. अनुरागच्या भूमिकेत अंकुश आणि अभिनय बेर्डे, तन्वीच्या भूमिकेत तेजश्री आणि आर्या असणं हे खरंच माझ्यासाठी आणि चित्रपटासाठी खूप महत्वाचं आहे.’
‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाची कथा आहे प्रत्येकाच्या पहिल्या प्रेमाची. ही कथा आहे अनुराग आणि तन्वीची. त्यांच्या शाळेच्या अल्लड दिवसांपासून ते आजपर्यंतची. प्रेमाला वयाचं बंधन नसतं. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात कोणीतरी एक खास माणूस असतं. आपल्या मनात एक हक्काची जागा असलेलं. अनुराग आणि तन्वी याला अपवाद नाहीत. ती सध्या.. जितकी या दोघांची गोष्ट आहे तितकीच प्रेमात पडलेल्या प्रत्येकाची ! पण प्रेमकथेची खरी गंमत त्याच्या हळुवार उलगडण्यात असते आणि या चित्रपटातून ती अनोख्या पद्धतीने मांडण्याचा सतीश राजवाडें यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे.
या चित्रपटात अनुराग आणि तन्वीच्या प्रेमकथेचे तीन टप्पे अनुभवायला मिळणार असून अनुरागची भूमिका साकारली आहे हृदित्य राजवाडे, अभिनय बेर्डे आणि अंकुश चौधरीने तर तन्वीच्या भूमिकेत निर्मोही अग्निहोत्री, गायिका-अभिनेत्री आर्या आंबेकर आणि तेजश्री प्रधान आहे. याशिवाय चित्रपटात सुकन्या कुलकर्णी- मोने, संजय मोने, अनुराधा राजाध्यक्ष, प्रसाद बर्वे आणि तुषार दळवी हे कलाकारही महत्वाच्या भूमिकेत आहेत.
पटकथा आणि संवाद मनस्विनी लता रवींद्र यांचे आहेत. चित्रपटाचं संकलन केलंय राहुल भाटणकर यांनी, छायाआरेखन आहे सुहास गुजराथी यांचं. या चित्रपटात एकूण चार गाणी असून ती संगीतबद्ध केली आहेत निलेश मोहरीर, अविनाश – विश्वजित आणि मंदार आपटे यांनी. यात ‘जरा जरा..’ आणि ‘परिकथेच्या पऱ्या..’ ही गाणी अश्विनी शेंडे यांनी शब्दबद्ध केली असून, ती आर्या आंबेकर आणि हृषीकेश रानडे यांनी गायली आहेत.
‘हृदयात वाजे समथिंग..’ हे गाणं लिहिलंय विश्वजित जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांनी तर स्वरबद्ध केलंय हृदित पाटणकर, रोहित राऊत आणि आर्या आंबेकर यांनी.