‘बॉम्बे आर्ट सोसायटी’च्या कला प्रदर्शनात होणार गौरव
‘द बॉम्बे आर्ट सोसायटी’चे १२६ वे वार्षिक कला प्रदर्शन १३ फेब्रुवारीला मुंबईतील जहांगीर कला दालनात सुरु होत असून, या प्रदर्शनाचे उद्घाटन १३ फेब्रुवारीला सायंकाळी ५ वाजता सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळीं सुप्रसिद्ध प्रतिथयश चित्रकार डॉ. जे.एस. खंडेराव यांना दिला जाणारा ‘रुपधर’ हा जीवनगौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येईल. विशेष गौरव सन्मान पद्मश्री मनोज जोशी, पद्मश्री सुधारक ओलवे, प्राचार्य नरेन्द्र विचारे यांना या सोहळ्यात सन्मानित करण्यात येईल. याशिवाय व्यावसायिक कलावंत आणि विद्यार्थी यांना त्यांच्या विशेष योगदानाबद्दल पुरस्कार आणि शिष्यवृत्ती देवून सन्मानित करण्यात येईल.
व्यावसायिक कलावंत अर्जुन माधव धर्माधिकारी, यशपाल सिंग, अरूप लोध, उदय कुमार टेकम, विक्रांत विश्वास भिसे, प्रदिप मंडल, राहुल धिमन, विनय रत्नाकर म्हात्रे, राधिका शार्दूल कदम, नागनाथ पंढरी देवकर, किरण गोरखनाथ कुंभार, कालिपाडा पुरकैत, दत्तात्रय मानिकराव मगडे, डॉ. कुसुमलता शर्मा, अतेश संभाजी पाटील, विकास कुशवाहा, राहुल संजय हरने, जगजीत राय, हरशित नीलकंठ बोंद्रे, रोहित धुमाळ, नानासाहेब येवले, शैलेश वर्तक, वैभव जागुष्टे, अरूप लोध हे व्यावसायिक विभागातील बक्षीसपात्र कलावंत आहेत.
विद्यार्थी कलाकारात शलाका दिलीप शेंडे, पार्थ पंकज ठक्कर, गणेश गोविंद खुटीकर, ओंकार वसंत फापळे, गौतम कुमार, शिवप्रसाद बन्नाती, कुमारी रीतू, विशाल दिलीप चव्हाण, अनिकेत भालचंद्र विश्वासराव, योगिंदर अग्रवाल, सिद्धेश श्रीधर जाधव, मोनु, अनामिका सिंग यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. एकूण ३७ कलाकारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे.
कलाक्षेत्रात प्रतिष्ठेचं मानलं जाणारं हे प्रदर्शन दिनांक १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी २०१८ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्व कलारसिकांना विनामूल्य खुलं राहील.
बॉम्बे (मुंबई) आर्ट सोसायटीचे अध्यक्ष वासुदेव कामत म्हणाले की कलाजगतात सोसायटीचा नावलौकिक असून चित्रकला आणि शिल्पकला या क्षेत्रातील कलाकारांना सतत उत्तेजन देण्याचं काम ही संस्था करीत आहे.
राष्ट्रीय पातळीवरील कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन यावेळी भरणार असून विविध कलाप्रकारातील कलाकृती या प्रदर्शनात पाहता येतील. मुंबईकर रसिकांना अनेक कलाकारांच्या कलेचा अविष्कार या प्रदर्शनात अनुभवता येणार आहे.