गुलाबी थंडीत साडेपाच कोटींची कमाई
‘ती सध्या काय करते’ या प्रश्नाने सध्या प्रत्येकाच्या हृदयालाच हात घातला असून, गुलाबी थंडीत ‘ती सध्या..’ बॉक्स ऑफिसवर धूम करतेय असेच चित्र पाहायला मिळत आहेत.
गेल्या दोन- तीन दिवसांपासून राज्यात गुलाबी थंडीने शिरकाव केलाय. शहराचं तापमान काही अंशी कमी झालं असलं तरीही बॉक्स ऑफिसवरचं तापमान मात्र गरमागरम आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात झी स्टुडिओज् निर्मित ‘ती सध्या काय करते’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि रसिकांनी चित्रपटगृहांवर एकच गर्दी करत यावर आपल्या पसंतीची ठसठशीत मोहोर उमटवली. पहिल्या तीन दिवसांतच या चित्रपटाने सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड झळकावत साडेपाच कोटी रुपयांची घसघशीत कमाई केली आहे.
महाराष्ट्रासोबतच इतर राज्यातही प्रदर्शित झालेल्या आणि पहिल्या प्रेमाच्या रम्य आठवणीत घेऊन जाणाऱ्या ‘ती सध्या काय करते’चित्रपटाला सर्वच प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली. प्रेक्षागृहातून बाहेर पडणारा प्रत्येक प्रेक्षक भारावून गेल्याच्या प्रतिक्रिया देत आहे. सोशल नेटवर्क साइट्सवरूनही चित्रपटाबद्दल, कलाकारांबद्दल, यातील
गाण्यांबद्दल प्रेक्षक भरभरून आपल्या भावना व्यक्त करतायत. विशेषतः या सर्वांमध्ये तरूण वर्ग मोठ्या प्रमाणावर व्यक्त होताना दिसतोय.
चित्रपटाची कथा आणि संवाद यांसोबतच अंकुश चौधरी, तेजश्री प्रधान, अभिनय बेर्डे आणि आर्या आंबेकर यांचे देखील सर्वांकडून भरभरून कौतुक होत आहे.
‘ती सध्या’च्या या यशाबद्दल दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की, “ती सध्या.. हा चित्रपट बनवणं हे माझं स्वप्न होतं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या सहका-यांनी, कलाकारांनी आणि सर्वच तंत्रज्ञांनी सर्वांनीच अगदी जीव तोडून मेहऩत घेतली. या मेहनतीमुळेच आज हे यश बघायला मिळतंय. चांगल्या चित्रपटाला रसिक प्रेक्षक कायमच दाद देतात, कौतुक करतात. ती सध्या काय करते ला सुद्धा अशीच कौतुकाची थाप आणि पसंतीची पावती मिळाली. या प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे.”
या चित्रपटाची निर्मिती आणि वितरण करणा-या झी स्टुडिओजचे बिजनेस हेड निखिल साने म्हणाले की, “ती सध्या काय करतेचं यश हे आमच्यासाठी आणि मराठी सिनेइंडस्ट्रीसाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण हिंदीमधील तगड्या चित्रपटांची स्पर्धा असतानाही ‘ती सध्या ‘ ने बॉक्स ऑफिसवर आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध केलं. हजार-पाचशेच्या चलनी नोटांवरील बंदीच्या निर्णयाचा परिणाम या चित्रपटावर होऊ न देता प्रेक्षक इतर पर्यायांचा वापर करुन चित्रपटगृहात फिल्मचा आनंद घेत आहेत हे आमच्या दृष्टीने खुपच आशादायी चित्र आहे. मराठी चित्रपटाने परत एकदा नवं यशोशिखर गाठलं आहे याचा आनंद आहे. या यशाचं श्रेय मी सर्व रसिक प्रेक्षकांना आणि माझ्या व चित्रपटाच्या संपूर्ण टीमला देतो.