‘स्टार प्रवाह’ची नवीन मालिका १० ऑक्टोबरपासून
मराठी टीव्ही मालिकांमध्ये नवा प्रवाह आणताना ‘स्टार प्रवाह’नं त्याला भव्यता आणि तंत्रज्ञानाचीही जोड दिली आहे. १० ऑक्टोबरपासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होत असलेल्या ‘गोठ’ या मालिकेचं काही चित्रीकरण अंडरवॉटर करण्यात आलं आहे.

कोकणाच्या पार्श्वभूमीवरची ही मालिका आहे. अत्यंत वेगळ्या पद्धतीचा हा टीजर मालिकेविषयी उत्सुकता निर्माण करत आहे. सोशल मीडियातून या टीजरला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये मोठं नाव असलेले छायालेखक अभिषेक बासू यांच्या मार्गदर्शनाखाली अंडरवॉटर चित्रीकरण करण्यात आलं आहे.

फिल्मसिटीतील लेकमध्ये आणि एका स्विमिंग पूलमध्ये खास व्यवस्था करून हे चित्रीकरण झालं. अंडरवॉटर चित्रीकरण फार खर्चिक असतं. त्यासाठी खास व्यवस्था करावी लागते. मात्र, अभिषेकनं मांडलेली अंडरवॉटर चित्रीकरणाची कल्पना मालिकेची निर्मिती संस्था फिल्म फार्म आणि स्टार प्रवाह यांनीही ‘आता थांबायचं नाही’ या विचारानं उचलून धरली आणि ही कल्पना प्रत्यक्षात आणली. त्यासाठी अत्याधुनिक कॅमेरे, अंडरवॉटर चित्रीकरणातील तज्ज्ञ छायालेखकांनी काम केलं. भव्यता आणि उत्तम वातावरण निर्मिती करणारं छायांकन हे या मालिकेचं खास वैशिष्ट्य ठरणार आहे.