१५ ऑक्टोबरला राज्यात साजरा होणार ‘वाचन प्रेरणा दिन’
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त १५ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणा-या वाचन प्रेरणा दिनी महाराष्ट्रातील २१ अंध दिव्यांग शाळांना १०० ग्रंथांची (बोलक्या पुस्तकांची- ऑडीओ सीडीची) पेटी मराठी भाषा विभागाकडून भेट देण्यात येणार आहे. प्रत्येक पेटीत १०० निवडक सीडीज अशा एकूण सुमारे २१०० सीडीज या संचांमध्ये असतील. महाराष्ट्रातील २१ जिल्हयांत, नॅब डॉ. मोडक संशोधन केंद्राच्या माध्यमातून, अंध दिव्यांग शाळांना प्रत्येकी एकेक ग्रंथपेटी भेट देण्यात येणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी दिली.
नजिकच्या काळात वाचन प्रेरणा दिन हा नो गॅझेट दिवस म्हणून साजरा होईल] असा विश्वास तावडे यांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षीपासून डॉ. कलाम यांचा जन्मदिवस १५ ऑक्टोबर हा ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. गेल्या वर्षी पहिला वाचन प्रेरणा दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि अभूतपूर्व प्रतिसादासह संपन्न झाला. यामध्ये प्रसारमाध्यमांचीही भूमिका खूपच मोलाची ठरली, असे सांगताना तावडे म्हणाले की, वाचन प्रेरणा व संस्कृतीचा विकास ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच यंदाही वाचन प्रेरणा दिन उत्साहाने साजरा करायचा आहे. ज्ञानसंपन्न व माहितीसमृद्ध समाजाची घडण, व्यक्तिमत्त्व विकास, साहित्य विकास आणि भाषाविकास यांसाठी वाचन संस्कृतीचा विस्तार आणि विकास करणे अत्यावश्यक आहे. सर्व माध्यमांच्या व सर्व मंडळांच्या (बोर्डांच्या) शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये, खाजगी आणि सार्वजनिक ग्रंथालये, साहित्यिक व सांस्कृतिक संस्था, प्रकाशक – लेखक – पुस्तक वितरक, वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या अशा सर्वच घटकांनी वाचन प्रेरणा दिनी कार्यक्रम-उपक्रम आयोजित करावेत, असे आवाहन मी शासनाच्या वतीने करीत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आपल्याला भरघोस प्रतिसाद देईल, असा विश्वास तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.
मुंबईत बोरिवली (प) येथील गोखले एज्युकेश सोसायटीच्या महाविद्यालयात ‘ग्रंथ तुमच्या दारी’ योजनेच्या माध्यमातून २१ वाचनप्रेमी गटांना ग्रंथपेट्या भेट देण्यात येणार आहेत. ही योजना कुसुमाग्रज प्रतिष्ठानची असून आमदार हेमंत टकले व विनायक रानडे हे योजनेचे प्रवर्तक आहेत, तर मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेचे प्रायोजकत्व यास लाभले आहे, अशी माहिती देताना तावडे म्हणाले की, मुंबई उपनगरांतील २१ सर्वसाधारण वाचनप्रेमी गटांना ग्रंथपेटी भेट देण्यात येईल. या प्रत्येक पेटीत १०० निवडक पुस्तके, अशी एकूण २१०० पुस्तके असतील. ही ग्रंथपेटी एक हजार घरांपर्यंत पोहचवण्याचा आमचा संकल्प आहे, असेही त्यांनी सांगितले.
२०० पेक्षा कमी पुस्तके असलेल्या महाराष्ट्रातील सुमारे ३२ हजार शाळांना शालेय शिक्षण विभागाकडून पुस्तक खरेदीसाठी निधी देण्य़ात आला आहे. एसीईआरटीच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या द्वैभाषिक पुस्तकांच्या सूचीतून निवडक पुस्तके शाळा खरेदी करणार आहेत, अशी माहिती तावडे यांनी दिली.
यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रातील सुमारे १०० महाविद्यालयांत प्रत्येकी एक साहित्यिक/ विचारवंत /निवडक कलाकार जोडून देण्यात आला आहे. वाचक प्रेरणा दिनाच्या निमित्ताने डॉ. सदानंद मोरे, भानू काळे, डॉ. शेषराव मोरे, अरुणा ढेरे, डॉ. भीमराव गस्ती, गिरीश प्रभुणे, अमर हबीब, अच्युत गोडबोले, उत्तम कांबळे, चंद्रकांत कुलकर्णी, अभिराम भडकमकर, कौशल इनामदार, किशोर कदम (सौमित्र), राहुल सोलापूरकर, सुबोध भावे, अरुण नलावडे, अभिनेते गिरीश कुलकर्णी, राजन गवस, योगेश सोमण इत्यादी साहित्यिक/ कलाकार महाराष्ट्रात एकेका महाविदयालयात तरुण वाचकांशी संवाद साधणार आहेत. तसेच शेकडो महाविद्यालयांत काव्यवाचन, अभिवाचन, नो गॅझेट डे, वाचन कट्टा, समूह वाचन इत्यादी उपक्रम होणार आहेत, असेही तावडे यांनी सांगितले.
मराठी भाषा विभागाच्या वतीने मंत्रालय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी अभिवाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे. विश्वकोश निर्मिती मंडळाच्या माध्यमातून वाई तालुक्यात कोश आणि वाचन प्रेरणा याबाबतचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच राज्यभरातील काही प्रकाशकांकडून ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करून पुस्तक खरेदीमध्ये भरघोस सवलतींसह भव्य पुस्तक विक्रीचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर, सटाणा, रत्नागिरी व पुणे इ. ठिकाणी तेथील महाविद्यालयांतील विद्यार्थी स्वर्गीय साहित्यिकांच्या स्मारकांना आणि जुन्या ग्रंथालयांना भेट देण्याचा अभिनव उपक्रमही करणार आहेत, असे सांगत संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वाचन प्रेरणा दिनाच्या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन विनोद तावडे यांनी केले.