‘वाचन प्रेरणा दिना’निमित्त विनोद तावडे यांचे प्रतिपादन
अभ्यासापलीकडे अवांतर वाचन आयुष्याला दिशा देण्याचे काम करते हे आपण सर्व जण डॉ.ए.पी.जे.कलाम यांच्यामुळे शिकलो. डॉ. कलाम यांनीच येणाऱ्या काळात भारत महासत्ता देश म्हणून पुढे येईल असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांच्या लेखणीने समाजाला नवा दृष्टीकोन मिळाला, असे उद्गार शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहेत.



गगराणी यावेळी म्हणाले की, आज माहितीचा स्फोट होतो आहे असे असले तरी चांगल्या संस्कारासाठी वाचनाला पर्याय नाही. म्हणूनच चांगले आणि सुसंस्कृत नागरिक घडण्यासाठी आपण सर्वांनी वाचन केले पाहिजे. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रमातून वाचन संस्कृती रुजविण्याचे काम करण्यात येत आहे.
या कार्यक्रमादरम्यान उपस्थित विदयार्थ्यांनी गाणी, कविता आणि भाषण करुन उपस्थितांची मने जिंकून घेतली. कार्यक्रमानंतर तावडे यांनी उपस्थित विदयार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या नेमक्या अडचणी काय आहेत ते समजून घेतल्या.
केम्पस कॉर्नर येथील क्रॉसवर्ड पुस्तकालयाला भेट
सेवासदन येथील कार्यक्रमानंतर मराठी भाषा विकास मंत्री विनोद तावडे यांनी केम्पस कॉर्नर येथील क्रॉसवर्ड पुस्तकालयाला भेट दिली. या भेटीत येथे उपस्थित असलेल्या विदयार्थ्यांशी संवाद साधला. वाचक प्रेरणा दिनाचे नेमके महत्व काय आहे हे सांगत असताना आजच्या दिवशी आपण सर्वांनी हा दिवस ‘नो गॅझेट डे’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी तावडे यांनी विदयार्थ्यांना वाचनाचे महत्व सांगताना काही गंमतीशीर किस्सेही सांगितले.
येथील क्रॉसवर्ड येथील पुस्तकालयाला पूर्ण झालेली 24 वर्ष यानिमित्ताने एक केक कापण्यात आला. यावेळी केम्पस कॉर्नर येथील क्रॉसवर्डचे प्रकाश सावंत उपस्थित होते.
वेलिंगकर इन्स्टिट्यूट

सोशल सर्व्हीस लिग कार्यक्रम
परळ येथील सोशल सर्व्हीस लिग हायस्कूलमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. वाचन प्रेरणा दिन म्हणजे काय?, हा दिवस का साजरा केला जातो?, डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी कोणती पुस्तके लिहिली?, आदि विविध प्रश्न शिक्षण मंत्र्यांनी विद्यार्थ्यांना विचारले. त्यानंतर विद्यार्थ्यांनीही आपल्या मनातल्या शंका शिक्षण मंत्र्यांना विचारल्या.
ग्रंथाली पुस्तक प्रकाशन

राज्यात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा
यानिमित्ताने राज्याच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात अभिवाचन स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी अभूतपूर्व व उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. भाषा संचालनालयाच्या मुख्यालय तथा राज्यभरातील इतर विभागीय कार्यालये यांमध्ये अभिवाचन स्पर्धा, ग्रंथप्रदर्शन, व्याख्याने असे कार्यक्रम पार पडले. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळातर्फे बहुभाषिक कवी संमेलन आयोजित करण्यात आले. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळानेही व्याख्याने व भव्य ग्रंथ प्रदर्शन तथा विक्रीचे आयोजन केले.
पुणे, कोकण, अमरावती, नागपूर, औरंगाबाद व नाशिक या सर्व विभागांतील विद्यापीठे व अनेक महाविद्यालयांमध्ये विचारवंतांची व्याख्याने झाली. केवळ हा कार्यक्रम कला किंवा मराठी महाविद्यालयांसाठी सीमित न राहता यंदा परिचारिका महाविद्यालये, अभियांत्रिकी, वैद्यकीय, व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
पुणे येथील औद्योगिक व्यवस्थापन मंडळात ज्येष्ठ संत साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांनी वाचनाने मला काय दिले यावर उत्कृष्ट व्याख्यान सादर केले. या संस्थेत अनेक अमराठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स.प.महाविद्यालय, पुणे या नामांकित संस्थेत भानू काळे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाबद्दल मार्गदर्शन केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शेषराव मोरे यांनी प्रतिभा निकेतन, वझिराबाद, नांदेड येथे सहभाग नोंदविला. अभिनव कला महाविद्यालय, पुणे येथे डॉ.मिलिंद लेले यांनी कलेच्या अनुषंगाने वाचनाचे महत्व विषद केले. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाविद्यालयात राजन गवस यांनी ज्ञान आणि माहिती यातील फरक स्पष्ट करून ‘निसर्गाचे वाचन कसे करावे’ यावर विद्यार्थ्यांना उद्बोधनपर व्याख्यान दिले.
ग्रंथालयाचा संदर्भ विभाग विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन दुर्मिळ ग्रंथाचे वाचन करण्याची मुभा बीडमधील बंकटस्वामी महाविद्यालयाने सर्व विद्यार्थ्यांना देऊन अभिनव उपक्रम केला. जळगांवातील मुळजी जेठा महाविद्यालयात महाराष्ट्र शासनाने गौरविलेल्या पहिल्या भाषा संवर्धक बेबीताई गायकवाड यांनी वाचनाने मला घडविले या विषयावर व्याख्यान दिले. ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी के.टी.एच.एम. महाविद्यालय, नाशिक येथे विद्यार्थ्यांमध्ये वाचन प्रबोधन केले.
सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी शासकीय तंत्रनिकेतन, मुंबई येथे वाचनाचा जीवनात झालेला सकारात्मक परिणाम याविषयी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले व किशोर कदम (सौमित्र) यांनी किर्ती कॉलेज, मुंबई येथे त्यांचा वाचनामुळे झालेला सामान्य ते असामान्य असा प्रवास विद्यार्थ्यांना कथन केला.
ई-बुक रिडिंगवर भर देत नागपूरच्या एस.बी.महाविद्यालयाने ई-बुक वाचनाचा अभिनव उपक्रम केला. अनुराधा परिचारिका महाविद्यालय, बुलढाणा येथे निरंतर वाचनाचा उपक्रम करण्यात आला. शासकीय विज्ञान महाविद्यालय, गडचिरोलीमधील विद्यार्थ्यांनी ‘नो गॅझेट डे’चा संकल्प करून महिन्यातील १ दिवस वाचनाला देण्याचे ठरविले.
सुप्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांनी जिल्हा ग्रंथालय, औरंगाबाद येथे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन केले. तसेच १५ दिवस नित्यनेमाने वाचन करणाऱ्या अनंत भालेराव विद्यालयामध्ये वाचनाने घडविले आम्हां या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले स्व-अनुभव कथन केले. नंदूरबार येथील आदिवासी शिक्षण संस्थेच्या कुलकर्णी महाविद्यालयात ‘वाचाल तर वाचाल’ या विषयावर प्राध्यापक जयपाल शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रायगडमधील पेण येथे गतिमंद व मतिमंद मुलांसाठी कार्यरत असलेल्या सुहित जीवन ट्रस्ट या शाळेत पालकांनी वृत्तपत्र वाचून व गतिमंद व मतिमंद मुलांनी गोष्टी कथन करून अभिनव पद्धतीने हा दिवस साजरा केला. मुंबई येथील एम.डी.महाविद्यालय, वडाळा यांनी ‘मोडी वाचन चळवळ- काळाची गरज’ या विषयावर डॉ. मनिष बावकर यांचे व्याख्यान आयोजित करून विशेष उपक्रम आयोजित केला. सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात वाचनामुळे झालेला सकारात्मक परिणाम पार्ले महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना कथन केला.