‘मिसेस टॉप ऑफ दि वर्ल्ड’मध्ये सेकंड रनरअप
नवी दिल्ली येथे झालेल्या झगमगत्या अशा ‘मिसेस टॉप ऑफ दि वर्ल्ड’ या जागतिक सौंदर्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ठाण्याच्या मिसेस वैष्णवी विकास अग्निहोत्री सेकंड रनरअप म्हणून विजयी झाल्या आहेत.
मिसेस टियारा इंडिया २०१६ ची विजेती असणाऱ्या वैष्णवी यांनी ‘मिसेस टॉप ऑफ दि वर्ल्ड’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. स्पर्धेच्या अंतिम फेरीत विजेतेपद जिंकण्यासाठी १५ विवाहित स्त्रियांमध्ये चुरस होती आणि या सर्व विवाहित स्त्रिया जगातील विविध देशातील होत्या.


मिसेस ठाणेपासून ते मिसेस टियारापर्यंत आणि तिथून अथक प्रयत्न करून ‘मिसेस टॉप ऑफ दि वर्ल्ड’मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना वैष्णवी या सौंदर्य सम्राज्ञीने खूप काही अनुभवले आहे.
ग्लॅमरस फोटो शूटपासून ते स्पर्धेत भाग घेण्यासाठी कायम पाठिंबा आणि प्रोत्साहन देणाऱ्या वैष्णवी यांच्या कुटुंबालाही या यशाचे श्रेय आहे. या स्पर्धेतील मुकुट परिधान करण्याचा तो क्षण वैष्णवी यांच्यासाठी खूप खास होता आणि हा संपूर्ण अनुभव त्यांना समृद्ध करणारा होता, असे त्या सांगतात.
आपले स्वप्न पूर्ण करताना एक एक पायरी यशाच्या अगदी जवळ जात होती. सर्वोत्तमातील सर्वोत्तमानी त्यांना प्रशिक्षण दिले होते. रेखा मिरजकर, ऋषीकेश मिरजकर आणि आरती बेलारी यांनी त्यांना प्रशिक्षणात खूप मदत केली. आपण कुठलीच गोष्ट कधी सोडून देऊ नये, असा त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन होता आणि अशाच धाडसाने आयुष्यात कायम त्या पुढे गेल्या. जेव्हा त्यांना ‘मिसेस टॉप ऑफ दि वर्ल्ड ब्युटी’ हा सन्मान मिळाला, तेव्हा ‘प्रत्येक स्त्री ही सुंदर आहे आणि आपण सुंदर आहोत, हे प्रत्येक स्त्रीला वाटले पाहिजे’ असे त्या ठामपणे सांगतात.
वैष्णवी यांची स्वतःची ‘तपस्या संगीत अकँडमी’ ही संस्था ठाण्यामध्ये कार्यरत असून त्याच्या चार शाखांमधून सहाशेपेक्षा अधिक विद्यार्थी संगीत आणि नृत्यकलेचं प्रशिक्षण घेत आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवरही हे प्रशिक्षण देता यावं या साठी त्या प्रयत्नशील आहेत.
एखाद्या ध्येयाशिवाय सौंदर्याला काहीच अर्थ नाही, असा त्यांचा ठाम विश्वास आहे.