प्रत्येक चित्रपटात आपल्या भूमिकेला यथोचित न्याय देणारी सई ताम्हणकर ‘वजनदार’ चित्रपटासाठी फक्त आपली भूमिकाच नव्हे तर पडद्यामागेही ऍक्टिव्ह झाली होती. असिस्टंट डिरेक्शन आणि आर्ट डिरेक्शन या विभागांना उत्तम सहकार्य करून तिने आपला ‘वजनदार’पणा अधोरेखित केला आहे.
सई पडद्यामागेही ‘वजनदार’च!
एक जबाबदार अभिनेत्री म्हणून आपल्या भूमिकेपलीकडे जाऊन पडद्यामागील कामातदेखील सक्रिय सहभाग घेणे तिला महत्वाचे वाटले. या निमित्ताने पडद्यामागच्या कलावंतांना किती तारेवरच्या कसरती कराव्या लागतात, हे सईने जाणून घेतले आहे.
शूटमधून ३ दिवसाचा ब्रेक मिळालेला असतानादेखील आराम किंवा भटकंती न करता सईने तिचा संपूर्ण वेळ ‘वजनदार’च्या सेटवरच घालवला. आपली भूमिका आणि चित्रपट कसा सोईस्कररित्या पूर्ण होऊ शकतो याचा जाणीवपूर्वक केला.
शूटिंगसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू या व्यवस्थितच असल्या पाहिजे, असा दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा अट्टाहास असायचा, त्यामुळे आर्ट डिरेक्शन टीमला असिस्ट करणे सईसाठी सोपे नव्हते. फ्रेम सुंदर दिसण्यासाठी ज्या वस्तू आवश्यक असतात त्या वेळेवर उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सईने उत्तमरीत्या पार पाडली. त्याचसोबत रोज पॅक-अप झाल्यानंतर सई असिस्टंट डिरेक्टर्ससोबत बसून पुढील दिवसाचं शेड्युल ठरवित असे, तसेच राहिलेले सीन्स वेळेत कसे पूर्ण करता येतील, यावर मार्ग काढत असे. इतकंच नव्हे तर जेव्हा सई सोडून बाकीच्या कास्टचं शूटिंग चालू असायचं तेव्हाही सई असिस्टंट डिरेक्टर्ससोबत वॉकीटॉकी घेऊन सेटवर सूचना देत असे.
सईला पडद्यामागच्या भूमिकेत पाहून शूटिंग बघायला आलेल्या लोकांचा उडालेला गोंधळ पाहताना सई म्हणते, “शूटिंग पाहायला आलेले सर्वजण मला पडद्यामागे बघून खूपच आश्चर्यचकित झाले होते पण पडद्यामागे काम करताना मला कळलं की ही सर्व कामं करताना किती संयम लागतो. कलाकारांच्या टँट्रम्समुळे सेटवरील कामावर कसा व किती परिणाम होतो आणि त्यावेळी पडद्यामागे काम करणाऱ्या प्रेत्येक माणसाची भावना काय असते, हे मला कळलं. आर्ट डिरेक्शन असो किंवा असिस्टंट डिरेक्शन ही कामं मी काही अचिव्ह करण्यसाठी नाही केली तर उलट ही कामं करताना एक कलाकार आणि एक पडद्यामागे काम करणारा कलाकार या दोन्हीही भूमिका मला अनुभवल्या मिळाल्या आणि त्या मला खूप काही शिकवून गेल्या.’