‘अस्तित्व’ आणि ‘मुंबई थिएटर गाईड’चा नवा उपक्रम
एकपात्री अभिनयाचे विविध अविष्कार रंगभूमीवर सातत्याने घडत असतात. शालेय स्तरापासून खुल्या गटापर्यंत विविध स्पर्धा तसेच उपक्रमांच्या माध्यमातून एकपात्री अभिनयाला व्यासपीठ मिळत असते. अभिनयाची प्राथमिक पायरी समजल्या जाणाऱ्या या एकपात्री कलाविष्काराला सादरीकरणाच्या वेगळ्या नव्या स्तरावर नेण्याच्या दृष्टीने अस्तित्व आणि मुंबई थिएटर गाईड यांच्यावतीने ‘वस्तूस्थिती’ हा नवा स्पर्धा उपक्रम सुरु केला जात आहे.

एकपात्री अभिनय कलाप्रकाराला एका ठराविक साच्यातून बाहेर काढून कलाकारांना त्यांच्या सृजनशीलतेला अधिक वाव देणे तसेच त्यांच्या प्रसंग फुलवण्याच्या क्षमतेत विस्तार करण्याचा महत्वाचा हेतू वस्तू स्थितीमुळे साध्य होईल. विशेष म्हणजे मोजके स्पर्धक आणि एखाद्या सभागृहाची मर्यादित जागा यात न अडकता, जगभरातल्या कोणालाही यात सहभागी होता यावे, म्हणून हा स्पर्धा उपक्रम ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.
गोष्ट सांगण्यासाठी किंवा प्रसंग रचण्यासाठी विशेषत्वाने तयार केलेल्या कठपुतळ्या, मुखवटे याचा वापर न करता, दैनंदिन वापरातल्या वस्तूंचा उपयोग अपेक्षित आहे. उदाहरणार्थ एक रुमाल लहान मुलीचे स्वरूप घेईल तर एखादा खोका गाडी बनेल. मुळात वस्तूला चेहरा, व्यक्तिमत्व नसल्यामुळे, त्याकडे सादरीकरणातला घटक म्हणून पाहताना, सादर करणारा आणि प्रेक्षक या दोघांच्याही सृजनशीलतेला आणि कल्पनाशक्तीला ते आव्हान असेल.
वस्तूस्थितीचे वेगळेपण कलावंताची अभिनयक्षमता तपासण्यासाठी मुख्यत्वे निवड चाचणी घेतली जाते, मात्र बहुतांश वेळा आधीच पुरवलेल्या संहितेमुळे कलाकारांच्या व्यक्त होण्याला मर्यादा निर्माण होतात. वस्तूस्थितीचा हा नवा आयाम वैयक्तिक अभिनयाला एक नवी उंची देणारा ठरतो. कारण केवळ प्रथम पुरुषी निवेदन या एकसुरी शैलीतून बाहेर पडत यात सादर करणारा ‘मुख्य कलाकार’, वस्तू’ सहकलाकार’ आणि घटना ही ‘पार्श्वभूमी’ अशी त्रिमिती त्याला प्राप्त होते. त्यामुळेच परंपरागत निवड चाचणीपेक्षा या माध्यमातून अधिक सक्षम कलाकारांची पारख करता येऊ शकते. हा वेगळा नाट्याविष्कार कलावंतांचीही कसोटी पाहणारा आणि त्यांच्या अभिनयक्षमतेला खुलवणारा आहे. तसेच या माध्यमातून समोर येणाऱ्या निवडक गुणवंत कलाकारांना थेट संधी देण्याचा पर्याय मनोरंजन क्षेत्रातल्या वाहिन्या, चित्रपट-नाट्य निर्मितीसंस्था यांना उपलब्ध होईल. हा स्पर्धा उपक्रम सर्व वयोगटांसाठी खुला असून विजेत्यांना आयरिस प्रॉडक्शन (www.irisproductions.in) या प्रथितयश निर्मिती संस्थेच्या सहयोगाने पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर माहिती www.vastusthiti.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.