टाळ्यांच्या गजरात मिळाली प्रेक्षकांची दाद
मामि महोत्सवात यंदा पहिल्यांदाच ‘मराठी टॉकीज’ भरवण्यात आली होती. या टॉकीजचा शुभारंभ पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ सिनेमाने झाला. चित्रपट सुरू झाला. संपला आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.


पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत व्हेंटिलेटर सिनेमाच्या मामि प्रिमिअरला राजकुमार हिरानींसारख्या दिग्गजाबरोबरच चित्रपटातील कलाकार आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, सतीश आळेकर, सुलभा आर्या, सुकन्या कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, संजीव शहा, विजू खोटे, स्वाती चिटणीस, निलेश दिवेकर, विनय निकम, भूषण तेलंग, नम्रता आवटे-सांभेराव, तन्वी अभ्यंकर, राहुल पेठे, नाना जोशी आदींसह चित्रपटाच्या निर्मात्या मधु चोप्रा यावेळी उपस्थित होत्या.
आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून लौकिक असणाऱ्या ‘मामि’ महोत्सवाची सुरूवात २० ऑक्टोबरपासून झाली. या महोत्सवात जगभरातील सर्वोत्तम चित्रपटांबरोबर भारतातील हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांचा प्रिमिअर दाखवण्यात येतो. यंदा या महोत्सवात पहिल्यांदाच ‘मराठी टॉकीज’ भरली होती. मॅगिज् पिक्चर्सच्या सहकार्याने बनलेला हा चित्रपट कित्येक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. प्रियांका चोप्राच्या मराठी निर्मितीतला पहिला सिनेमा, मराठीतील मातब्बर मंडळींची फौज, प्रियांकाचे गाणे, आशुतोष गोवारीकर यांचा अभिनय आणि राजेश मापुसकर यांचे मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकीय पदार्पण या सगळ्या वैशिष्ट्यांच्या जोडीला आता ‘मामि’ प्रिमियरच्या मराठी टॉकीजचा शुभारंभ करणारा चित्रपट… ही सुध्दा एक बाब ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटाच्या वैशिष्ट्यांमध्ये जोडली गेली आहे. या महोत्सवात पसंत केला गेलेला ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटगृहांत पाहायला ‘या रे या, सा रे या’ येत्या ४ नोव्हेंबरला!