सिनेमात शोधताहेत हरवलेल्या नात्यांचे प्रतिबिंब
चित्रपट हे मनोरंजनाचं माध्यम असलं तरी अनेकदा हे माध्यम आपल्याला आरसा दाखवण्याचं काम करतं. सध्या या आरश्याचे काम ‘व्हेंटिलेटर’ हा चित्रपट करत असून. सिनेरसिक त्यात त्यांच्या हरवलेल्या नात्याचे प्रतिबिंब शोधण्यात तल्लीन झाले आहेत. हा भावनिक गुंता व्हेंटिलेटर प्रेक्षकांना सिनेमागृहाकडे आकर्षून घेतो आहे.



प्रेक्षकांच्या या प्रतिसादाने दिग्दर्शक राजेश मापुसकरसुद्धा हळवे झाले होते. ते म्हणाले की, “प्रत्येकच कुटुंबात काही ना काही समस्या असू शकतात. दोन पिढ्या एकत्र आल्या की हे घडणारच पण आपण त्याचीच काळजी घ्यायला हवी. कोणतंही नातं हे संवादानेच टिकून राहतं त्यामुळे सतत संवाद साधला पाहिजे.. दोन पिढ्यांमध्ये विसंवादाची असणारी पुसटशी सीमारेषा पार करुन एकमेकांना समजून घेणं ही आजच्या शहरीकरणाने बदललेल्या समाजाची गरज आहे.. हीच गोष्ट डोक्यात ठेवून हा चित्रपट बनवला आणि आज प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया बघून आपला उद्देश पूर्ण होतोय असं वाटत आहे. मला अनेक लोक भेटतायत , काही वयाने मोठी माणसं येऊन हातात घेऊन भरभरुन बोलताहेत. त्या हातातील ओलाव्यातूनच त्यांच्या भावना माझ्यापर्यंत पोहचत आहेत आणि एक दिग्दर्शक म्हणून माझ्यासाठी ही मोठी पोचपावती आहेच शिवाय माणूस म्हणूनही मला मिळालेली ही खूप मोठी भेट आहे असं मी समजतो.’
आशुतोष गोवारीकरांच्या भूमिकेला जोरदार प्रतिसाद
व्हेंटिलेटरच्या माध्यमातून मराठी चित्रपटांच्या पडद्यावर तब्बल अठरा वर्षांनी अभिनेता म्हणून पुन:पदार्पण करणा-या आशुतोष गोवारीकर यांच्या भूमिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. ह्यात आशुतोषनी राजा कामेरकर ही व्यक्तिरेखा साकारलीये. हिंदीमध्ये यशस्वी दिग्दर्शक असलेला राजा आपल्या कुटुंबापासून आणि नातेवाईकांपासून काहीसा दुरावलेला आहे. एकीकडे ग्लॅमरची दुनिया आणि दुसरीकडे गावाकडची साधी भोळी मंडळी, त्यांच्या छोट्या छोट्या समस्या, अपेक्षा, वडिलांसोबतच्या विसंवादामुळे होणारी राजाची मानसिक घालमेल आशुतोष यांनी योग्यरित्या पडद्यावर मांडलीये. त्यांची ही भूमिका बघून आपला मराठमोळा अभिनेता आपल्याला परत दिल्याची ह्रद्य भावनाही प्रेक्षक व्यक्त करत आहेत आणि त्याबद्दल दिग्दर्शक राजेश मापुसकर व निर्मिती सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्रा यांचे आभार मानत आहेत.
समाजमाध्यमांवर प्रतिक्रियांचा पाऊस
एखाद्या आवडत्या आणि नावडत्या गोष्टीबद्दल, घटनेबद्दल मत व्यक्त करण्यासाठी फेसबुक, ट्विटर, व्हाट्सअॅपसारख्या सोशल नेटवर्कचा (समाजमाध्यमांचा) लोक मोठ्या प्रमाणावर वापर करतात. व्हेंटिलेटरच्या बाबतीतही या माध्यंमावर भरभरुन प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. चित्रपट आवडल्याच्या प्रतिक्रियांसोबतच आपल्या आयुष्यातील अनुभवही लोक इथे मांडत आहेत हे विशेष.
झी स्टुडिओजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या व्हेंटिलेटर चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने केली आहे. तिने गायलेल्या “बाबा” या गाण्याला सोशल मिडियावर जबरदस्त प्रतिसाद मिळत असून लवकरच ते चित्रपटाच्या पडद्यावरही बघायला मिळणार आहे. यानिमित्ताने मराठी चित्रपटविश्वात प्रवेश करणा-या प्रियांकाचंही कौतुक प्रेक्षक करत आहेत. समीक्षकांनीही असाच कौतुकाचा वर्षाव करत या चित्रपटाचं उत्कृष्ट कलाकृती असं गुणांकनही केलं आहे.