अनिल कपूर यांच्या हस्ते साँग लाँच
अंधेरीच्या राजावर प्रियांका चोप्राची अढळ श्रद्धा आहे. याच श्रद्धेने तिने तिच्या पर्पल पेबल पिक्चर्सच्या ‘व्हेंटिलेटर’ या पहिल्या मराठी चित्रपटाचं पहिलं गाणं हे अंधेरीच्या राजासमोर ढोल ताशांच्या गजरात अर्पण केले. अनिल कपूर यांच्या हस्ते या सॉन्ग लॉन्च सोहळ्यात या चित्रपटातले कलाकार जितेंद्र जोशी, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, संगीतकार रोहन–रोहन आणि प्रसिद्ध लोककलावंत डॉ. गणेश चंदनशिवे उपस्थित होते.

मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर मंडळींचा लवाजमा घेऊन पद्मश्री प्रियांका चोप्रा तिच्या मराठी पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. बॉलिवूड टू हॉलिवूड सफर करणाऱ्या प्रियांकाची चित्रसंस्था पर्पल पेबल पिक्चर्स धमाल कौटुंबिक विनोदी चित्रपट व्हेंटिलेटर मराठी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. फरारी की सवारी चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या राजेश मापुसकरांचेही हे मराठी पदार्पण आहे.
काही दिवसांपूर्वी या सिनेमातील दोन गणपतीच्या गाण्यांचा ऑडियो लाँच करण्यात आला होता. नुकतंच या सिनेमातील ‘जय देवा’ या गाण्याचा विडियो सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते लाँच करण्यात आला. यावेळी चित्रपटाचे संगीतकार रोहन – रोहन यांच्याबरोबरीने गणेश चंदनशिवे यांनी हे गाणे प्रेक्षकांसमोर सादर केले.

जय देवा गाण्याची स्तुती सगळ्यांनीच केली. गणपतीची स्तुती करणाऱ्या ‘जय देवा’ या गाण्याचे बोल मनोज यादव यांनी लिहिले असून रिदम अरेंजर सचिन आग्रे हे आहेत. रोहन-रोहन या जोडीने या चित्रपटातल्या गाण्यांना संगीताचा साज चढवला असून रोहन-रोहन जोडीबरोबर गणेश चंदनशिवे यांनी हे गाणे गायले आहे.
पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओ प्रस्तुत व्हेंटिलेटर या सिनेमाची निर्मिती डॉ. मधू चोप्रा आणि प्रियांका चोप्रा यांची आहे. हिंदी सिनेसृष्टीतले नावाजलेले दिग्दर्शक राजेश मापुस्कर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनीच या चित्रपटाची कथा ही लिहिली आहे. या सिनेमाचा विषय कौटुंबिक असून जितेंद्र जोशी यांच्यासह मराठी सिनेसृष्टीतील मातब्बर कलाकार या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.