चाहते म्हणाले, पहिली झलक दाखवा पुन्हा पुन्हा!
एखादा चित्रपट कसा आहे, याची ओळख देणारी झलक म्हणजे ट्रेलर. बहुचर्चित ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च सोहळा शनिवारी, १५ ऑक्टोबरला मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. या वेळी चित्रपट चाहत्यांनी ही झलक पुन्हा दाखवा म्हणत ट्रेलरलाही टाळ्यांचा कडकडाट आणि शिट्ट्यांची उत्तुंग दाद मिळाली. यामुळे ट्रेलरने ‘व्हेंटिलेटर’ची प्रचंड उत्सुकता वाढवली असल्याचे अधोरेखित झाले आहे.

व्हेंटिलेटरची नक्की गोष्ट काय आहे, कोण कलावंत आहेत याविषयीची बरीच उत्सुकता या चित्रपटाविषयी होती. ट्रेलर लॉन्च सोहळ्यानिमित्त या साऱ्या प्रश्नांची उकल करत एक जोरदार धमाका ‘दिवाळी’त मराठी सिनेसृष्टीत होईल, अशी अपेक्षा वाढवणारा व्हेंटिलेटर असल्याचे ट्रेलरवरून तरी दिसते आहे.


‘व्हेंटिलेटर’ची कथा आहे कामेरकर कुटुंबाची. दरवर्षी गणेशोत्सवात आपल्या वडिलोपार्जित घरात हा गणेशोत्सव साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंबप्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात येते. इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पीटलमध्ये धाव घेतात. आणि इथुन उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास. एका घटनेमुळं कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव.. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा, कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.. या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.


या चित्रपटात काम करण्याच्या अनुभवाबद्दल आशुतोष गोवारीकर म्हणाले की, ‘दिग्दर्शनात व्यस्त असताना पुन्हा कधी अभिनयाकडे वळेन असं कधीच वाटलं नव्हतं. परंतु यातील राजा कामेरकर या व्यक्तिरेखेसाठी मीच कसा योग्य आहे याबद्दलची खात्री राजेश मापुसकर बाळगून होते. यासाठी त्यांनी खुप आग्रह केला आणि प्रियांकानेसुद्धा निर्माती म्हणून विश्वास दाखवला आणि मी ही भूमिका स्वीकारली. मला या चित्रपटाची गोष्ट खुप आवडली. आता ट्रेलर पाहून तुम्ही जसे हसलात तसा मीदेखील फिल्मची संहिता वाचताना हसत होतो! या फिल्मच्या निमित्ताने मला उषा नाडकर्णी, सुलभा आर्या आणि सतीश आळेकर यांसारख्या दिग्गजांबरोबर काम करता आलं ही माझ्याकरता विशेष आनंदाची बाब होती.’
या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सतीश आळेकर, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, निखिल रत्नपारखी, नम्रता आवटे-सांभेराव, निलेश दिवेकर यांसह अनेक लोकप्रिय कलाकार या चित्रपटात बघायला मिळणार आहेत.
चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश मापुसकर यांचे असून छायाचित्रण सविता सिंह यांचे आहे. चित्रपटात दोन गाणी असून ती मनोज यादव आणि शांताराम मापुसकर यांनी लिहिली असून रोहन-रोहन या संगीतकार द्वयीने ती संगीतबद्ध केली आहेत. चित्रपटाचं संकलन रामेश्वर भागवत यांनी केले आहे. येत्या ४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.