विजयराज बोधनकर यांच्या कलाकृती नेहरू सेंटरमध्ये
रंगांच्या माध्यमातून अध्यात्मिकता आणि भारतीय तत्वज्ञान, परंपरा यांची सांगड घालत काढलेली चित्रे काढून मनाला मोहवून टाकणारे प्रख्यात चित्रकार विजयराज बोधनकर यांच्या समथिंग आऊट ऑफ नथिंग चित्र कलाकृतींचे प्रदर्शन मुंबईच्या नेहरू सायन्स सेंटरमध्ये मंगळवार 22 नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. 28 नोव्हेंबरपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

“बोधनकरांनी जणू काही परंपरेचा, प्रातिनिधिक चिन्हांचा,प्रतिमासृष्टीचा त्याग करून रिकाम्या पोकळीतून उत्क्रांत होणाऱ्या आकारांच्या किमानतेची कास धरली आहे असे दिसते. ह्या किमानतेच्या पोकळीची भारलेली ऊर्जा,दिमाखदार रंगछटांतून प्रकट होते आणि तटस्थ पांढऱ्या थरांच्या घडणाऱ्या आणि उलगडत जाणाऱ्या अनेक चित्तवेधक रचनांकडे लक्ष वेधते.काही चित्रांमध्ये आपल्या परिचयाचे कापडी पोत असलेले ग्रहासारखे वाटणारे मोठे वर्तूळ चित्राला विश्वाचे परिमाण प्रदान करते. हा ऊर्जेचा मांडलेला एक खेळ आहे जो अहेतुकपणे घडतो आहे. ह्या विश्वाबाहेरील कोणताही “कर्ता”हा खेळ घडवत नाही.निरागसपणा आणि मोहकता ह्या गुणांमुळे ही चित्रे अतिशय प्रभावी वाटतात. “ असे मत चित्रकला विषयाचे अभ्यासक दिपक घारे यानी प्रदर्शनाबाबत व्यक्त केले आहे.
बोधनकर यांच्या मते “नथिंगनेस” ही काही घडत असण्याचाच उत्सव साजरा करणारी सकारात्मक ऊर्जा आहे. जग एका अंधाऱ्या पोकळीत विरघळत आहे. “नथिंगनेस” हा स्वतंत्रपणे सतत अस्तित्वात आहे. परंतु सत्य हे आहे कि आपण त्याला वेगवेगळ्या रितीने पाहतो.
अनुभववाद्यांना “नथिंगनेस” हा अस्तित्वाचा केलेला नकार वाटतो. अध्यात्माचे कोंदण घेऊन साकारलेल्या अनोख्या चित्रांचे प्रदर्शन मुंबईत नेहरू सायन्स सेंटरमध्ये 22-28 नोव्हेंबर दरम्यान सकाळी 11 ते सायंकाळी 7 वेळेत सुरू राहणार आहेत.