भक्ताशी असलेलं भावनिक नातं गुंफणार
चंद्रकांत पवार दिग्दर्शित ‘विठ्ठला शप्पथ’ या चित्रपटाच्या निमित्ताने विजय साईराज आणि कृतिका गायकवाड ही जोडी प्रथमच एकत्र आली आहे. या चित्रपटामध्ये पवार यांनी विठ्ठलाच त्याच्या भक्ताशी असलेलं भावनिक नातं अधोरेखित केलं आहे.

वडील आणि मुलगा यांच्यातील नात्यावर आधारित असलेल्या या चित्रपटात मुलाची भूमिका साकारण्यासाठी एका नव्या चेहऱ्याची गरज होती. ऑडीशनद्वारे बऱ्याच जणांचा शोध घेतला पण हवा तसा चेहरा दिग्दर्शकांना मिळत नव्हता. मात्र ओळखीतून विजयचं नाव समोर आलं.

दिग्दर्शनासोबतच चंद्रकांत पवार यांनीच या चित्रपटाची कथा-पटकथा लिहिली असून, कौस्तुभ सावरकर आणि भानुदास पानमंद यांच्या साथीने त्यांनी संवाद लिहिले आहेत. विजय-कृतिका या जोडीसोबत या चित्रपटात मंगेश देसाई, अनुराधा राजाध्यक्ष, उदय सबनीस, विद्याधर जोशी, संजय खापरे, अंशुमन विचारे, केतन पवार, विजय निकम, प्रणव रावराणे, राजेश भोसले या कलाकारांच्याही भूमिका आहेत. राहुल देशपांडे, स्वप्नील बांदोडकर, आनंदी जोशी, आदर्श शिंदे, प्रवीण कुवर या मराठीतील आघाडीच्या गायकांच्या आवाजात या चित्रपटातील गीतरचना रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. मंगेश कागणे, क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना चिनार-महेश या मराठी चित्रपटसृष्टीतील सध्याच्या आघाडीच्या संगीतकार जोडीने संगीत व पार्श्वसंगीत दिलं आहे.